पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुष्काळी परिसरात पत्रकारांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.या पत्रकारांच्या गटात प्रदीप नावाचा संवेदनशील पत्रकार आहे.त्याच्या नजरेतून हा पाहणी दौरा टिपला आहे.सलगच्या दुष्काळाने हा परिसर काळवंडून गेलेला आहे.पत्रकारांचे एक जग या कथेत आहे.जे जग या पाहणी दौ-याकडे केवळ सहल म्हणून पाहते.मौजमजा व साइट सीइंग म्हणून ते याकडे पाहतात.सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व सद्य:स्थितीशी त्यांचे काहीही देणेघेणे नसते.न पिकलेली शेती,पिण्याच्या पाण्याची समस्या,रोजगार हमीची तुटपुंजी कामे,रेशन दुकानदाराची मनमानी यातून एका कडवट काळ्या,करड्या रंगाचे चित्र उभे केले आहे.एका बाजूला हिरवा सुपीक समृद्ध प्रदेश व दुस-या बाजूला कोरडा भणंग प्रदेश या विषयीच्या भौगोलिक परिसराचे चित्र या कथेत आहे.प्रदीप आपला जुना कॉलेजचा मित्र तहसीलदार पाटील यांच्या बरोबर दुष्काळातील विविध ठिकाणची पाहणी करतो.या पाहणीदरम्यान चांगल्या शासकीय योजनांचा भ्रष्टाचार व लालफितीच्या कारभारामुळे कसा फज्जा उडतो याचे दृश्य प्रदीपला दिसते.प्रदीप मुंबईला आल्यानंतर या दुष्काळी भागावर फार चांगली स्टोरी करतो.मात्र ती वृत्तपत्रात छापली जात नाही.

 'उदक' कथेत सामाजिक संदर्भाची अनेक परिमाणे आहेत.पाण्याविनाची तीव्रता किती खोलवरची असू शकते,पाणी हे बहिष्काराचे व शोषणाचे हत्यार असू शकते,आणि सत्ताधारी वर्ग त्याचा मुजोरपणे वापर करू शकतो याची जाणीव ही कथा देते. दलितांमधील नवजागृतीमुळे गावातील सवर्णांचा पोकळ स्वाभिमान दुखावला जातो व नवबौद्धांवर गाव बहिष्कार टाकतो. एका तांड्यावर त्यांना आश्रय घ्यावा लागतो. तो चढणीवर असल्यामुळे तिथे पाण्याची सोय नसते. बी.डी.ओ. नी तिथे एका टॅकरची सोय केलेली असते. या बौद्धवाड्यातील दहावी झालेल्या विचारी प्रज्ञाची ही शोकान्त कथा आहे. प्रज्ञाची रमावहिनी गर्भवती आहे. ती तापाने फणफणलेली आहे. दवाखान्याची सोय नाही. ताप कमी व्हावा म्हणून अंग पाण्याने पुसून घ्यावे लागते. तेही नीट मिळत नाही. पाणी आणण्यासाठी ती टॅकरकडे जाते, त्या वेळी इब्राहिम ड्रायव्हर तिच्यावर अत्याचार करतो. ती पाणी घेऊन येते त्यावेळी रमावहिनी व तिचे बाळ मरण पावलेले असते. एकाच वेळी जात आणि स्त्रीच्या लैंगिक शोषणाची जाणीव ही कथा करून देते. पाणी माणसाला बहिष्कृत करते. अनेक माणसे, स्त्रिया यात पिचतात, या जाणिवेचे सूचन करणारी ही महत्त्वाची कथा आहे.

 थीम बेस्ड कथेचा आणखी एक आविष्कार म्हणजे 'नंबर वन' (२००८) हा कथासंग्रह. खेळाडूंमधील माणसांच्या कथा असे शीर्षकात त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंमधील माणूसपण शोधण्याचा हा प्रयत्न आहे. देशमुख यांच्या लेखक म्हणून संवेदनशीलतेचे वेगळेपण म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले; त्या त्या अनुभवक्षेत्राचा उपयोग त्यांनी आपल्या ललित लेखनात

लक्षदीप ॥ ९॥