पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला आहे. पुण्यातील क्रीडा व युवक सेवा विभागाचे संचालक म्हणून काही वर्षे ते कार्यरत होते. या काळातील खेळाडूंचे विश्व त्यांनी जवळून पाहिलेले असणार. त्यांच्या भावविश्वाच्या कथा ‘नंबर वन' मध्ये समाविष्ट आहेत. समाजजीवनात खेळाडूंच्या विशिष्ट प्रतिमा तयार झालेल्या असतात. या स्व-स्वप्नप्रेमात खेळाडू मश्गूल असतात. या खेळाडूंचे खाजगी आयुष्य कोणत्या प्रकारचे असते, स्वप्रतिमेच्या आहारी गेल्यामुळे ब-याच वेळेला त्यांचे व्यक्तिगत आयुष्य कोलमडून पडते. माणूसपण आणि कलावंतखेळाडू यांच्यातील झगडा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वसत असतो. या पेचाला देशमुखांच्या कथेने साकार केले आहे. समाजाचे रिअल हिरो असणा-या खेळाडूंच्या भावविश्वाच्या या कथा आहेत. खेळाडूंच्या संघर्षाच्या विजिगीषा वृत्तीच्या या कथा आहेत. विजयासाठी झुंजणाच्या खेळाडूंच्या या कथा आहेत. जीवनातील अडथळे पार करून यशस्वी ठरलेल्या खेळाडूंच्या कथा या संग्रहात आहेत, पाथरवट समाजातील मीना आशियाई स्पर्धेत दुसरी येते. गुन्हेगारी जगतातील एका शार्प शूटरचे राष्ट्रीय खेळाडूत रूपांतर होते. तर मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त असणारा बॅडमिंटनपटू यश संपादन करतो. पिचलेल्या समाजातील उपजत गुणवत्तेचा अन्वयार्थ या संग्रहातून प्रकटला आहे.
 याबरोबरच या कथांमधून खेळाडूंच्या जीवनातील दुस-या बाजूचेही चित्रण आहे. जिंकण्यासाठी ते वाट्टेल ते करत राहतात. असूया, जीवघेणी स्पर्धा आणि अपेक्षित यश ज्यावेळी मिळत नाही त्यावेळी ते प्रत्यक्ष कोलमडून पडतात. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्यक्षातले आपले सौंदर्य आणि खेळ यांच्या काचात अडकलेल्या प्रतिमा आहेत. तर ‘बंद लिफ्ट' सारख्या कथेत नजीकच्या काळातील भारतातील दोन महान खेळाडूंच्या विश्वावर आधारित कथा आहेत. या संग्रहातील कथासूत्रांना आणखी एक पदर आहे. तो म्हणजे महिला खेळाडूंच्या भावविश्वाच्या कथा. महिला खेळाडूंकडेही समाज भेददृष्टीने पाहतो. क्रीडाजगतातील 'रन बेबी रन या कथेतील महिला अॅथलेटिक खेळाडू व तिच्या प्रशिक्षकाच्या अनोख्या विश्वाची, शोकात्म संवेदनेची कथा आहे. तिला मिळणाच्या दुय्यमत्वाची वागणूकच या कथांमधून साकारली आहे. या खेळाडू यशस्वी झाल्या तरी समाज त्यांच्याकडे मादी, पत्नी, प्रेयसी रूपातच पाहतो. या जाणीवविश्वाच्या या कथा आहेत.

 ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' (२०१३) हा देशमुख यांचा वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार करणारा कथासंग्रह. स्त्रीभ्रूणहत्येविषयक जाणिवेचे सूत्र या संग्रहामध्ये आहे. समकालीन वास्तवातील एका महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या भयकारक विषयाकडे लक्ष वेधले आहे. सामाजिक जीवनातील या प्रश्नास कथांमधून सजीव केले आहे. भारतीय समाजात स्त्रीकडे नेहमीच गौणत्वाने पाहिले गेले आहे. आधुनिकीकरणाच्या टप्प्यावर या समाजाने एक विचित्र असे समाजवास्तव आकाराला आणले. समाजाने चुकीच्या धारणी तयार केल्या आहेत. मुलगा हा वंशाचा दिवा, कुलदीपक, म्हातारपणाची

१० । लक्षदीप