पान:लंकादर्शनम्.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३

होणार नाहीं, सदैव आनंदच उत्पन्न होईल असे अत्यंत रमणीय स्थल सीलोन मध्ये नुवारा एलिया खेरीज दुसरे कोणतेही नाही. रामचंद्राबरोबरचे सैनिक दक्षिण हिंदुस्थानांतून लंकेत गेले त्यांनी तेथे नुवारा एलियासारखें अत्यंत रमणीय स्थान पाहिल्यावर त्यास अशोकवन हे नांव दिले असावे असे दिसते. नुवारा एलिया जवळच सीता एलिया आहे. रावणाने सीतेस जेथे ठेविले त्या ठिकाणास सीता एलिया (सीतेचा बाग किंवा सीतावन) असे नांव द्वीपस्थ लोकांनी दिले; तेच अद्यापपर्यंत चालू राहिलेले दिसते. अशोकवन हें नुवारा एलियास परकीयांनी दिलेले नांव असल्यामुळे ते द्विपस्थांत चालू राहिले नाहीं व यामुळेच आज अशोकवन या नांवानें कोणताच भाग सीलोनमध्ये प्रसिद्ध नाहीं.

 कन्या नांवाच्या झऱ्यावरच रावणाने आपल्या सापत्न मातेचे उत्तर कार्य केलें या वरून रावणाचे निवासस्थान ट्रिंकोमालीपासून बरेच दूर असावे असे दिसते. रावणाचे निवासस्थान जर जवळच असते तर तो उत्तर कार्यास घरी परत गेला असता. तेव्हां ट्रिंकोमालीहून बरेंच दूर असलेले व जेथील भूमि सुवर्णमय म्हणजे अत्यंत मोलाची आहे असे सीलोनमधील ठिकाण रत्नपुरम् हे होय.

 एवंच सर्व गोष्टींचा विचार केला असतां रत्नपुरम् येथे रावणाची राजधानी असावी व रत्नपुरम् जवळच म्हणजे कांहीं मैलावर असलेल्या नुवारा एलिया या अत्यंत रमणीय ठिकाणी सीतेस ठेविलेले असावे असे दिसते.

सीलोन मधील शेतकी
लागवडी खालील क्षेत्र

 या बेटांतील जमीनीचे क्षेत्र सुमारे १६। दशलक्ष एकर आहे. त्या पैकी ३| दशलक्ष जमीन प्रत्यक्ष लागवडी खाली आहे. निरनिराळ्या पिकांचे क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.