पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वस्त किंवा घेतलेल्या अनुभवाविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठीच केवळ अभिव्यक्तीची गरज असते, असे म्हणणे पुरेसे नाही. केवळ मनात ठेवून किंवा कल्पनारम्यतेने मुलांचे, प्रौढांचे समाधान का होत नाही ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पेन्सिल हातात घेऊन शारीरिक हालचाल करणे, स्नायूंचा उपयोग करणे, विशिष्ट दिशेने हातपाय हलविणे, एवढा मर्यादित अर्थ 'व्यक्त' होण्यामध्ये असत नाही. तर जी चिह्न, आकार, कृती मुले दाखवू इच्छितात, त्याला त्यांना स्वत:चा अर्थ द्यायचा असतो. म्हणजेच परस्पर संबंध साधण्याचा प्रयत्न अभिव्यक्तीतून केला जातो. मुलांना हा संबंध साधण्याची आवश्यकता का भासते ? इतरांशी जोडले जाणे ही एक सामाजिक कृती असते. व्यक्ती आणि समाज यांच्यातील एकरूपता साधणे ही मानवी प्रवृत्ती असते. समूहाशी अभिव्यक्तीतून संवाद साधला जातो. कोणतीही अभिव्यक्ती केवळ स्वत:साठी नसते तर इतरांकडून स्वत:च्या कृतीला प्रतिसाद मिळावा या प्रेरणेतून अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न असतो.
 कलात्मक, प्रतिभाशाली कृती मनाला सांत्वना देतात. वातावरण प्रसन्न करतात. निसर्गाशी असलेले माणसाचे नाते समजावून देतात. संस्कृती व राष्ट्र यांतील एकात्मता जपतात. रवींद्रनाथ टागोरांची 'गीतांजली', उदयशंकरांचा पदन्यास, आर.के. लक्ष्मणांच्या चित्ररेखा, रविशंकरांची सतार, भीमसेन जोशींचे गायन, सत्यजीत रॉय यांचे चित्रपट या कलाअभिव्यक्ती देश-काल यांच्याही पलिकडे जाऊन पोहोचतात.
अभिव्यक्ती उपक्रम
 मुलांच्या उत्स्फूर्त कृतीला योग्य मार्गदर्शनामुळे वळण लागते. त्यातून विशेष क्षमता, तांत्रिक कौशल्य विकसित होते. अभिव्यक्तीच्या शिक्षणातून इतरांच्या अभिव्यक्तीचा, वैयक्तिक कलाविष्काराचा विचार करण्याची व त्यातूनच कलात्मक रसग्रहणाची सवय विद्यार्थ्यांना लागते.
मूळ प्रवृत्ती व अभिव्यक्ती संबंध
 १. सहानुभावाची प्रेरणा: एकमेकांशी संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे ऐकण्याची व काही सांगण्याची इच्छा असते. अभिनयाच्या इच्छेमागे नाट्यवृत्ती असते.
 २. सौंदर्यवादी कलात्मक प्रवृत्ती: कलात्मक प्रवृत्तीमुळे रेखाटणे, रंगविणे, शिल्प घडविणे यांची इच्छा होते. गुणगुणणे, गाणे म्हणणे या प्रवृत्तीमुळे नृत्य व संगीताची इच्छा असते.
 ३. शास्त्रीय वृत्ती: कार्यकारणभाव जाणून घेण्याची इच्छा असलेली चौकस बुद्धी, काही तयार करण्याची रचनात्मक प्रवृत्ती यामागे शास्त्रीय वृत्ती असते.

(४२)रूप पालटू शिक्षणाचे