पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
अभिव्यक्ती विकास


 अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींचा सुसंस्कृत अविष्कार म्हणजे शिक्षण. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व विकसित करणारे योग्य शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन समाजात माणूस म्हणून जगण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे ही आजची निकड आहे. आवाज, प्रतिकृती, प्रतिमा, हालचाली, साधने किंवा वस्तू तयार करण्याची क्षमता अभिव्यक्तीच्या शिक्षणातून मिळते. या गोष्टी जो चांगल्या प्रकारे करू शकतो, तो उत्तम शिकला असे म्हणता येईल. उदा. चांगले स्वर, शब्द, अवगत केलेला उत्तम बोलतो, उत्तम गायक होतो, उत्तम कवी होतो. आकाराची जाणकारी असलेला चित्रकार, शिल्पकार होऊ शकतो. लयबद्ध हालचाली शिकलेला नर्तक होतो. विचारांची सर्व क्षेत्रे, स्मरण, तर्कशास्त्र, संवेदनशीलता, बुद्धिमत्ता या गोष्टी वरील प्रक्रियेप्रमाणेच आहेत. त्यामुळेच अभिव्यक्तीच्या विविध पद्धतींमध्ये व्यक्तीला कुशल, समृद्ध करणे हा व्यक्तिविकासाचा, शिक्षणाचा महत्त्वाचा पैलू आहे, असे निश्चित म्हणावेसे वाटते. प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची क्षमता, कुवत जाणून शिक्षण दिले गेले पाहिजे. अभिव्यक्तीच्या पद्धतीनुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणजे मुलांचे वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापन झाले असे म्हणावयास हवे.
मुक्त अभिव्यक्ती
 जन्मल्यापासून लहान मूल काही व्यक्त करायला सुरुवात करते. भोवतीच्या लोकांना स्वत:चे अस्तित्व जाणवून देण्याची एक नैसर्गिक, मूलभूत इच्छा असते. मुलाचे रडणे, हसणे, हावभाव या गोष्टी म्हणजे इतरांबरोबर संपर्क साधण्याची त्याची भाषा असते. मुलांना स्वतःचे मूड, मन:स्थिती व्यक्त करण्याची इच्छा असते. शारीरिक हालचाली आणि मानसिक प्रक्रिया यांनी मुक्तअभिव्यक्ती व्यापलेली असते. क्रीडा' ही मुलांची मुक्त अभिव्यक्ती असते. कारण खेळातून स्वत:ला व्यक्त करणे ही मुलांची अंतरंगातून उमटलेली निखळ उर्मी असते. खेळण्यात उत्स्फूर्तता असते. कलामाध्यमातून या उत्स्फूर्ततेचा अनुभव मुले घेऊ शकतात.
अभिव्यक्तीचा हेतू
 अभिव्यक्त होणे ही मनाची गतिशील प्रक्रिया असते. अभिव्यक्तीचा हेतू कोणता? मुलांना त्यांच्या भावना बाह्यरूपात का व्यक्त कराव्या वाटतात ? एखादी पाहिलेली



रूप पालटू शिक्षणाचे(४१)