पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सामाजिक जाणिवेतून स्वाभाविकरीत्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा विकास होण्यासाठी नुसते प्रेरणा जागरणही पुरत नाही. प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत, त्यांची उत्तरे कशी शोधली पाहिजेत, याची चर्चा करण्यासाठी परिस्थिती ज्ञानाचे तास योजले जातात. स्वतंत्र वेळात बैठकी होतात. महाविद्यालयीन युवकांसाठी अभ्यास शिबिरे होतात. कोणी सजग युवक-युवती संबंधित प्रांतांमध्ये जाऊन प्रश्न समजावून घेतात. १९८३-८४ च्या दोन पंजाब सद्भाव यात्रा, समाज ऐक्य समितीच्या कामासाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतून दौरे, गुरखा प्रश्नासंबंधीचा कलकत्ता-दार्जिलिंग दौरा आणि 'सती'प्रश्नासंबंधातील राजस्थान दौरा, ठाण्याच्या वनवासी क्षेत्रात झालेले तीन-चार अभ्यासदौरे, काश्मीर-गुजराथ- विदर्भातील दौरे असे अनेक दौरे नेहमीच जात असतात. या ठिकाणी गेलेल्यांचे अनुभवकथन ऐकणे, लेखन वाचणे ही शालेय विद्यार्थ्यांना मोठी पर्वणी असते.
आध्यात्मिक अधिष्ठानाकडे लक्ष वेधण्यासाठी उपक्रम
 शैक्षणिक वर्षारंभी व वर्षाच्या शेवटी होणा-या उपासनेत परब्रह्म तत्त्वाबद्दल वेद- उपनिषदे यांनी काय सांगितले आहे, गीता-ज्ञानेश्वरी काय सांगते याचा परिचय प्रबोधिनीत विद्यार्थ्यांना होतो. या विचारांची ओळख करून देणा-या सामुदायिक उपासना मराठी अर्थासह काही पुस्तिकांमध्ये मांडलेल्या आहेत. त्यातील श्लोकांना सुमधुर चाली लावलेल्या आहेत. त्यात गद्य संकल्पही आहेत ! विद्याथ्र्यांचा भावनाकोश समृद्ध करण्याचे मोठे सामर्थ्य या उपासनांमध्ये आहे.
 आठवड्यातून एकदा विद्याथ्र्यांची सामुदायिक उपासना असते. स्थिर वृत्तीने आसनमांडी घालून चित्त एकाग्र कसे करावे याचा अभ्यास घेतला जातो. ओंकाराचा उच्चार, त्यानंतर शक्तिमंत्र, विरजामंत्र, मग ध्यान व शेवटी गायत्री मंत्राचे उच्चारण करून ‘अमुच्या बुद्धीला तो (सविता) प्रचोदना देवो' अशी प्रार्थना करावयाची, असा सुमारे वीस मिनिटांचा हा कार्यक्रम असतो. विद्यार्थ्यांनी विद्याव्रत संस्कारानंतर घरीसुद्धा ही उपासना रोज करावी, असे सांगितले जाते. व्यक्तिगत उपासनामार्गाचे प्रत्येकाचे स्वातंत्र्य अबाधित राखलेले आहे. समूहाने विधायक काम करावे ही भावना वाढवण्यासाठी एकत्रित उपासनांचा चांगला लाभ होतो.
 अशा विविधांगी मांडणीमध्ये उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन असते. विचार भिन्नतेचेही स्वागत असते. जसजशा यातील संकल्पना भावत जातात तसतसे, अधिक उंचीचे निश्चय विद्यार्थी करतात. शालेय वयोगटापासून वरिष्ठ प्रौढापर्यंत सर्वजण या शिक्षण प्रक्रियेला हातभार लावत असतात. त्यामुळे दहावीचे शिक्षण झाल्यावरही अनेकजण या कार्याशी निगडित राहातात.



रूप पालटू शिक्षणाचे(१७)