पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक कौशल्यांचा विकास
 व्यक्तीने समूह आणि समाज यांत कसे वागावयाचे याबद्दलची जाणीव समृद्ध करण्यासाठी अनेक कार्यक्रम असतात. संघटित जीवनाचा अनुभव येण्यासाठी पथकयोजना असते. सहली व शिबिरांमधून सहकार्य व स्पर्धा यांचा समतोल साधला जातो. कार्यसिद्धीची प्रेरणा (अचिव्हमेंट मोटिव्हेशन) व नेतृत्व (लीडरशीप) यांचे प्रशिक्षण कामाच्या मांडणीतच असते. युवक कार्यामध्ये गटनायकापासून युवक सचिवांपर्यंत पदश्रेणी आहे. अशा कामांमध्ये लागणारे लेखी नियोजन, व्यक्तींशी संवाद व समायोजन, आर्थिक हिशेब, प्रतिवृत्त लेखन अशी कौशल्ये बैठकीमधून व कार्यक्रम आखताना शिकविली जातात. चर्चाकौशल्ये, श्रवणकौशल्ये, संधी व आह्वाने स्वीकारण्याची वृत्ती, प्रतिसादी वृत्ती यांचा ऊहापोह होतो. प्रत्येक कार्यक्रमानंतर काय चांगले झाले, काय उणे राहिले असा शोध-बोध होतो. त्या वेळी उपक्रमाचे मर्म स्पष्ट होते. अशा प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. आर्थिक व्यवहार करण्याची संधी त्यांना देण्यासाठी काही विक्री उपक्रम असतात. राख्या, फटाके, तिळगूळ, पेये, तसेच निधिसंकलनासाठी केलेल्या कार्यक्रमांच्या प्रवेशिका, यांच्या विक्रीच्या निमित्ताने विद्यार्थी अनोळखी समाजात जातात, प्रबोधिनीची ओळख धीटपणे करून देतात व ग्राहकांची मने जिंकून उपक्रम यशस्वी करतात.
 समाजात मिसळण्याचे आणखीही मार्ग आहेत. त्यात विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव वाढावी व सेवाभावना त्यांच्या अंगी बाणावी असा उद्देश असतो. दुष्काळग्रस्त प्रदेशाची पाहणी, झोपडपट्टीतील संपर्क, श्रमशिबिरे आणि आपत्कालीन मदतकार्ये ही त्याची निमित्ते असतात. अशा कामांनंतर विद्यार्थ्यांच्या मनावर उमटलेले ठसे ते मनोगत लेखनातून व्यक्त करतात. काही वेळा सर्वांचे एकत्र निवेदनही योजले जाते.
राष्ट्रीय प्रेरणा जागवण्यासाठी योजलेले उपक्रम
 सामाजिक बांधिलकी हे केवळ योजनेतून अंगी मुरणारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रेरणेचा झरा आतून उत्पन्न व्हावा लागतो. हा देश माझा आहे, हे राष्ट्र वैभवशाली झाले पाहिजे. अशी उत्कट भावना विद्यार्थ्यांनी कधी तरी आतून अनुभवली पाहिजे. इतिहासकथन, पद्ये ही माध्यमे त्यासाठी आहेत. मातृभूमि हे दैवत येथे ...' ही भावना विद्याथ्र्यांच्या मनी रुजवावी, यासाठी विविध प्रकारची रचना असते. पुणे, निगडी व सोलापूर या प्रबोधिनीच्या तीनही केंद्रांमध्ये हिंदुस्थानच्या चित्रमूर्तीची आणि ओंकाराची प्रतिष्ठापना केली आहे ती त्यासाठी ! स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेचे ते मूर्त स्वरूप आहे.




(१६) रूप पालटू शिक्षणाचे