पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षण-पद्धतीचा परिणाम :- अनुधावन
 ज्ञान प्रबोधिनीने स्वीकारलेल्या शैक्षणिक तत्त्वज्ञानानुसार चाललेल्या उपक्रमांची व्याप्ती आतापर्यंतच्या मांडणीतून लक्षात येईल. बौद्धिक विकासासाठीचे उपक्रम मुख्यत: शाळेत व्हावेत अशी प्रबोधिनीची कल्पना आहे. शारीरिक विकासासाठीचे उपक्रम युवक संघटनेत व्हावेत अशी योजना असते. मानसिक विकासाच्या विविध दिशा स्वतंत्रपणे मांडलेल्या आहेत. सामाजिक जाणीव, गटात काम करण्याची वृत्ती, राष्ट्रीय प्रेरणा आणि भावनाकोश किंवा हृदयगुणांचा परिपोष अशा विविध प्रकारे मानसिक विकसन होणे शक्य आहे. शाळा आणि युवक संघटना अशा दोन्ही माध्यमांतून मानसिक विकसन होऊ शकेल. प्रबोधिनीमध्ये मुख्यतः युवक संघटनेचे हे काम आहे असे मानले आहे. आत्मिक विकासासाठीचे उपक्रम शाळेत योजता येतात.
 प्रबोधिनीमध्ये शाळा व युवक संघटना ही दोन माध्यमे एकत्र आणायचा प्रयत्न केला आहे. प्रबोधिनीच्या शाळांमध्ये येणा-या विद्यार्थि-विद्यार्थिनींना दोन्ही माध्यमांच्या उपक्रमांचा लाभ होतो. प्रबोधिनीच्या शाळांमध्ये न येता अन्य शाळांमध्ये जाणा-या किंवा महाविद्यालयातल्या विद्यार्थि-विद्यार्थिनींनाही युवक संघटनेच्या उपक्रमांचा लाभ होतो. प्रबोधिनीतले औपचारिक शिक्षण संपलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनातही युवक संघटनेचे सदस्य म्हणून प्रबोधिनीत येतात. त्या वेळी ते उपक्रमांच्या संयोजनातही भाग घेतात. शालेय वयातील विद्यार्थ्यांशी काही उपक्रमांमध्ये तरी त्यांच्याहून तीन-चार वर्षांनी मोठ्या गट-प्रमुख किंवा मार्गदर्शकांचा संपर्क आला पाहिजे. या संपर्कातून होणा-या आंतरक्रियांचा प्रेरणा वाढण्यास उपयोग होतो. तो करून घेतला पाहिजे अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. सर्वांगीण शिक्षणपद्धतीच्या मांडणीचा प्रयोग प्रबोधिनीने नेतृत्व विकसनासाठी मांडला आहे. सर्वांगीण विकसनाचा परिपाक म्हणून नेतृत्व विकसन घडले पाहिजे. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत जे समर्पित वृत्तीने व राष्ट्रीय प्रेरणेने नेतृत्व करतील असे कार्यकर्ते घडविणे हे प्रबोधिनीचे उद्दिष्ट संस्था-स्थापना लेखातच लिहून ठेवले आहे. नेतृत्व विकसनाची संकल्पना प्रबोधिनीत कशी विकसित होत गेली आहे याची मांडणी स्वतंत्र पुस्तिकेत केली आहे.
प्रबोधिनीत रूढ झालेले नवे शैक्षणिक उपक्रम
 भूमिकेमध्ये मांडलेल्या उद्दिष्टांनुसार प्रबोधिनीमध्ये शैक्षणिक उपक्रमांच्या बाबतीत अनेक प्रयोग गेल्या २५-३० वर्षांत झाले. त्यांपैकी सिद्ध होऊन रूढ झालेल्या उपक्रमांची यादी पुढे दिली आहे. एखाद्या शाळेत नव्याने काही उपक्रम सुरू करायचे

(१८) रूप पालटू शिक्षणाचे