पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करत असतो हे विद्यार्थ्यांना दाखवून दिले पाहिजे.
मूल्यांचे शिक्षण
 उपासना आणि अध्यापन, संस्कारांची पुनर्रचना आणि शैक्षणिक चळवळी याबद्दल मांडणी झाली. आता शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक विकासासाठीच्या उपक्रमांची चर्चा सुरू करायची आहे, पण त्यापूर्वी मूल्यशिक्षणाबाबत प्रबोधिनीची भूमिका मांडली पाहिजे. धार्मिक शिक्षण किंवा नैतिक शिक्षण किंवा मूल्यशिक्षण यासाठी वेगळ्या तासांची किंवा वेगळ्या वेळाची किंवा वेगळ्या उपक्रमांची योजना करण्याची प्रबोधिनीची भूमिका नाही. विद्याथ्र्यांचे सर्व शैक्षणिक जीवनच नीती शिकवणारे, मूल्य रुजवणारे झाले पाहिजे. पूर्ण दिनक्रम आणि सारे आयुष्यच समाजधारणेचा विचार करत, इतरांच्या हित-सुखात माझे हित-सुख असा विचार करत घालवायचे आहे अशी प्रबोधिनीची भूमिका आहे.
 विद्यार्थिदशेत शिक्षणसंस्थांनी कोणती मूल्ये विद्यार्थ्यांसमोर ठेवावीत ? मूल्ये आत्मसात केल्याचे उच्चारातून, कृतीतून, भावनांच्या अभिव्यक्तीतून दिसते. त्यासाठी अनुक्रमे ‘सत्यं वद’, ‘धर्म चर’ आणि ‘स्वाध्यायात् मा प्रमदः' व 'मातृ-पितृ-आचार्य देवो भव' हे उपनिषदातील प्राचीन आदेश आजही आवश्यक आहेत. यांच्या बरोबरीने प्रबोधिनीत ‘राष्ट्र देवो भव' हे मूल्य देखील स्वीकारले आहे. ही सर्व आज्ञार्थक वाक्ये आहेत. त्याचा प्रभाव पडायचा असेल तर ही मूल्ये जगणारे मार्गदर्शक विद्यार्थ्यांसमोर पाहिजेत. मनुष्य अपूर्ण असल्यामुळे, स्खलनशील असल्यामुळे, पूर्णत: याप्रमाणे जगणे फारच थोड्यांना साधते. म्हणूनच मार्गदर्शकांमध्ये पारदर्शकता पाहिजे.
   यानि अनवद्यानि कर्माणि तानि त्वया सेवितव्यानि नो इतराणि ।
   यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि नो इतराणि ।'
 उपनिषदातील या उद्गारांमध्ये मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना काय सांगायचे ते चांगल्या रीतीने व्यक्त होते. आमची चांगली कामे व चांगली चरित्रे तेवढी तुम्ही घ्या, आमच्यातील उणीवा व दोष घेऊ नका', अशी मार्गदर्शकांची स्पष्टपणे सांगण्याची तयारी हवी. मूल्यशिक्षण म्हणजे मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांकडे मूल्यांचे संक्रमण ! ते सर्व प्रसंगी होऊ शकते. चारित्र्यनिर्मितीसाठी मूल्यशिक्षण हा शिक्षणपद्धतीचा स्थायी भाव असला पाहिजे. मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा एक तुकडा होऊ शकत नाही. शालेय शिक्षणाचे काम हे जसे औपचारिक पद्धतींनी चालते, तसेच ते सर्वांगीण विकासाच्या तपशीलवार मांडणीमुळे पूर्णतेकडे वाटचाल करते. बौद्धिक, शारीरिक, मानसिक व आत्मिक विकास, सामाजिक विकास आणि राष्ट्रीयत्वाचा विकास, अशी विकासाची

रूप पालटू शिक्षणाचे(१३)