पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक बहुभुजाकृती प्रबोधिनीमध्ये आहे.
बौद्धिक विकास
 आजूबाजूच्या परिसराबद्दल व त्या परिसरातील वस्तू, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित रचना आणि व्यक्ती यांच्याबद्दल जिज्ञासा जागृत होणे ही बौद्धिक विकासामधली आरंभीची पायरी आहे. ग्रंथालयाचा वापर करणे, वाचनाचे महत्त्व कळून त्याची गोडी लागणे, विविध जीवनोपयोगी हत्यारे व अवजारे हाताळणे, वस्तू आणि व्यक्तींचे परस्पर-संबंध कळणे, पदार्थांचे व माहितीचे पृथक्करण करता येणे, भिन्न भिन्न प्रकारच्या माहितीमधली संगती शोधता येणे अशा कौशल्यांच्या वापरातून जिज्ञासा पूर्ण होते व नवीन प्रश्न लक्षात येतात. निरीक्षण, वाचन, चिंतन आणि कृती करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रयोगशाळेत, वर्गात आणि घरी देखील प्रयोग करणे, लहान-मोठ्या गटांमध्ये व गटांसमोर आपले म्हणणे सांगण्याची संधी देणे, आह्वानात्मक कामे देणे असे उपाय प्रबोधिनीत वापरले जातात. जिज्ञासापूर्ती, समस्यापरिहार आणि नवनिर्मिती यासाठी आवश्यक ती कृती सुचणे व ती करता येणे व गरजेप्रमाणे कृती बदलता येणे यांतून बौद्धिक विकास झाल्याचे लक्षात येत असते. याकरिता स्वत: शिकण्याच्या प्रक्रियेला उत्तेजन आहे. शालान्त वर्ष सोडून आधीच्या इयत्तांमध्ये अभ्यासक्रमात लवचिकपणा आहे. गणित, शास्त्र, भूगोल, इतिहास हे विषय सातवीपर्यंत पाठ्यपुस्तकांशिवाय कसे शिकविता येतील, याचे प्रयोग चालु। आहेत. मुले पाचवीपासून छोटे-मोठे प्रकल्प करतात. त्यातून त्यांची स्वाध्यायकौशल्ये वाढतात. भौतिक विज्ञान व सामाजिक शास्त्र यांतील प्रकल्पांबरोबरच वाङ्मयातील प्रकल्पही काही विद्यार्थी करतात. प्रश्न पडला की न अडता नावीन्यपूर्ण रीतीने मार्ग कसा काढावा याच्या शिक्षणासाठी वेळापत्रकात प्रतिभाविकसनाचे तास आहेत. जलद वाचनासाठी सर्वांनाच विशेष शिक्षण दिले जाते. पाचवी-सहावीपासून वाचनाची कौशल्ये आत्मसात करता आली तर चांगल्या आकलनासह वेग चौपट वाढू शकतो. वेळाची मोठीच बचत होते. विज्ञान शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्वत:च्या हातांनी जास्तीत जास्त प्रयोग करायला मिळतील असा प्रयत्न असतो.
शरीर सतेज सुंदर
 कसदार शारीरिक शिक्षणाची एक परंपराचे प्रबोधिनीत तयार झालेली आहे. क्रीडाविषयांचा सुरचित अभ्यासक्रम असतो. आवश्यक तेथे तज्ज्ञ मार्गदर्शकांची योजना असते. हिवाळी शिबिरांमध्ये काही विशेष कौशल्ये शिकविली जातात. त्या

(१४) रूप पालटू शिक्षणाचे