पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणत्याही उपक्रमांमधून काही ना काही अनौपचारिक शिक्षण होते. या उपक्रमांच्या कल्पनेचा अनेक ठिकाणी, शेकडो-हजारो लोकांपर्यंत प्रसार झाला, विविध ठिकाणी त्या उपक्रमांमध्ये स्वत:च्या कल्पनांप्रमाणे बदल करून पाहणे सुरू झाले, एखाद्या सिद्ध झालेल्या तंत्राची आवृत्ती सुरू झाली, त्या कल्पनेमागच्या विचाराची दखल सैद्धान्तिक पातळीवरही घेतली जाऊ लागली की अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर झाले असे म्हणता येईल. शिक्षणसंस्थेने समाजातील शैक्षणिक चळवळींमध्ये सहभागी होणे, नवीन शैक्षणिक चळवळी सुरू करणे हे उर्वरित सामाजिक पर्यावरण शिक्षणानुकूल होण्यासाठी आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे प्रशस्तिपत्रके व प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया' या संकुचित कल्पनेपासून सर्वत्र, सर्वकाळ चालणारे सर्वंकष शिक्षण या व्यापक कल्पनेपर्यंत समाजाचा प्रवास होण्यासाठी शिक्षण-संस्थांना सामाजिक पर्यावरणावर परिणाम घडवण्याच्या हेतूने स्थिर कामाबरोबर चळवळींचा उपयोग करणे आवश्यक आहे.
 चळवळींमध्ये रूपांतर होऊ शकतील असे अनेक उपक्रम प्रबोधिनीमध्ये नित्य चालू असतात. काही प्रयोग कार्यकर्ते व्यक्तिगत जबाबदारीवर करून पाहत असतात; तर काही प्रयोग प्रबोधिनीचे म्हणून सुरू झालेले असतात; इतरांनी केलेले काही प्रयोग किंवा सुरू केलेल्या चळवळी याची आवृत्तीही प्रबोधिनीमध्ये चालू असते. शिक्षणसंस्थेचा जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि तो व्यक्त होण्यासाठी देखील चळवळींचा उपयोग असतो.
 या पुस्तिकेमध्ये मुख्यत: सिद्ध झालेल्या उपक्रमांची तपशिलात माहिती द्यायची असल्याने प्रायोगिक परंतु चळवळीत रूपांतर होण्याची क्षमता असलेल्या किंवा चळवळ बनलेल्या अनौपचारिक शिक्षणाच्या उपक्रमांचा पुढे केवळ नामोल्लेख केला आहे. पुणे, शिवापूर, वेल्हे, सोलापूर, हराळी, निगडी, साळुुंंब्रे या प्रबोधिनीच्या सर्व केंद्रांवर असे उपक्रम चालू असतात. छात्र प्रबोधन मासिक, साखर शाळा, ग्रामीण प्रज्ञा विकास योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्र, किशोरी विकास योजना, महिलांचे बचत गट, जिजामाता केंद्र, पाणी समिती, शेती सुधारणा मंडळ, बालविकास केंद्र, बालकामगार शाळा, साक्षरता अभियान, सत्संग केंद्र, स्वास्थ्य केंद्र, आचार्य-कुल, समूहगान स्पर्धा, मुख्याध्यापक प्रशिक्षण, पवनामाई उत्सव असे अनेक उपक्रम प्रयोगाच्या विविध टप्प्यांवर आज चालू आहेत. आपल्या शैक्षणिक भूमिकेला सामाजिक पर्यावरण अनुकूल करून घेण्यासाठी चाललेला प्रबोधिनीचा हा प्रयत्न आहे. परिस्थिती अनुकूल नाही म्हणून अडून बसणे किंवा रडत बसणे विद्यार्थ्यांना शिकवायचे नसेल तर शिक्षणसंस्थांनी आपल्या कृतीने परिस्थितीवर परिणाम घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न




(१२) रूप पालटू शिक्षणाचे