पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही.
 सुट्टीच्या काळातील व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीनेच सर्वप्रथम पुण्यात सुरू केली. सर्वप्रथम प्रबोधिनीच्या प्रशालेतील मुलांसाठी, नंतर इतर शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व क्रमश: इतर गावांमध्येही प्रबोधिनीने अशी शिबिरे सातत्याने योजली. या शिबिरातले सुटे-सुटे उपक्रम अनेकांनी पूर्वी योजले असले तरी त्यांचे तीन ते सात दिवसांच्या कालावधीसाठी केलेले एकत्रीकरण प्रबोधिनीमध्येच १९७२ साली सर्वप्रथम झाले. तेव्हापासून अव्याहतपणे अशी व्यक्तिमत्त्व विकसन शिबिरे प्रबोधिनीमध्ये चालू असतात. या कल्पनेचा प्रसार प्रबोधिनीच्या प्रयत्नानेच झाला असे म्हणणे कठीण असले तरी अशी शिबिरे उपयुक्त आणि यशस्वी होऊ शकतात असा नमुना प्रबोधिनीने सतत सर्वांसमोर ठेवला.
 गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसमोर शिस्तपूर्ण तरीही जोशपूर्ण बरची-नृत्याचे गट पाठवायला प्रबोधिनीने १९६४-६५ सालापासून सुरुवात केली. सातत्याने अनेक वर्षे आजतागायत असे बरची-नृत्याचे गट मिरवणुकांमध्ये जात असतात. विसर्जन मिरवणुकी हे पुण्याचेच वैशिष्ट्य असल्याने या कल्पनेचा प्रसार पुण्याबाहेर विशेष झालेला नाही. परंतु प्रबोधिनीचे पाहून आणि प्रबोधिनीच्या प्रयत्नाने १९८० नंतर पुण्यात पंधरा-वीस संस्थांचे असेच गट मिरवणुकीत दिसू लागले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये प्रबोधिनीच्या सोलापूर केंद्रानेही असेच प्रयत्न केले आहेत.
 कौटुंबिक संस्कारांची पुनर्रचना जशी प्रबोधिनीने केली तशी सत्यनारायण पूजेसाठी सामाजिक पर्याय म्हणून महापुरुष पूजेची रचना केली. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश प्रतिष्ठापना पोथीची रचना केली. मंडळांनी या सार्थ पोथीचा वापर करावा असा प्रबोधिनीचा आग्रह असतो. ग्रामीण भागात दारूच्या व्यसनापासून मुक्तीसाठी सामूहिक मालाधारण विधीचे प्रयोगही प्रबोधिनीने तीन-चार वेळा करून पाहिले आहेत. ग्रामीण स्त्रियांसाठी सामुदायिक हरितालिका पूजनाचे प्रयोगही खेड-शिवापूर येथे काही वर्षे चालू आहेत. गावाच्या विकास कामांसाठी जमणाच्या गटाने उपासना करून बैठकीला प्रारंभ करणे असा प्रयोगही काही वर्षे दोन गावांमध्ये चालू आहे.
शैक्षणिक चळवळी
 नव्याने रूढ झालेल्या कल्पनेची दोन उदाहरणे वर दिली आहेत. चालू असलेल्या काही इतर उपक्रमांचा उल्लेखही पुढे केला आहे. कल्पनेची मालकी एका व्यक्तीची किंवा संस्थेची न रहाता ती कोणाचीही किंवा सर्वांची झाली की त्या कल्पनेचा प्रसार होतो.




रूप पालटू शिक्षणाचे(११)