पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्कार कार्यक्रम
 भारतीय परंपरेमध्ये सोळा संस्कारांची कल्पना आहे. पूर्वी कधीतरी अड्ठेचाळीस होते असे म्हणतात. ते लोप पावून सोळावर संख्या आली. ती संख्याही घटत जाऊन नामकरण, विवाह, अंत्येष्टी अशी तीनावर आली. कुठे या तीनांत चौथ्या उपनयनाचा समावेश आहे तर कुठे या तीनपैकीही काहींना फाटा मिळाला आहे. संस्कार अर्थहीन झाल्यामुळे लोप पावतात. परंतु अप्रत्यक्ष संस्कारांशिवाय जाणीवपूर्वक व समारंभपूर्वक केलेल्या संस्कारांचा उपयोगही जाणवतो. जाणीव कमी होणार नाही व समारंभांचा अतिरेक होणार नाही अशी संस्कार कार्यक्रमांची रचना केली तर आयुष्यातील टप्प्यांचा निर्देश करण्यासाठी व स्वत:ची भूमिका आता बदलायची आहे याची व्यक्तीला जाणीव होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
 प्रबोधिनीने नामकरण, विवाह अंत्येष्टी या कौटुंबिक संस्कारांच्या व उपनयन या कौटुंबिक व शैक्षणिक संस्काराच्या पुनर्रचित पोथ्या तयार केल्या आहेत. सोळा संस्कारांमध्ये नसलेल्या षष्ट्यब्दिपूर्ती व एकोद्दिष्ट श्राद्ध ( मरणोत्तर दहाव्या ते चौदाव्या दिवसांचे विधी ) या पारंपरिक संस्कारांच्या पोथ्या केल्या आहेत. देहदानाच्या आधुनिक पद्धतीसाठी नवी पोथी रचली आहे. या पोथ्या वापरून अनेक कुटुंबांमधून संस्कार व्हायला सुरुवात झाली आहे. सुटसुटीत, कमी खर्चिक अशा व्यावहारिक कारणांसाठी आज याचा जास्त प्रसार होत असला तरी त्या पोथ्यांमधील अर्थवाहीपणा उपस्थितांना जाणवतो. संस्कारांकडे अर्थपूर्ण दृष्टीने पाहणे व घरच्या वातावरणातून होणा-या अप्रत्यक्ष संस्कारांशिवाय परंपरेतील संस्कारांचा जीवनदृष्टी देण्यासाठी घरच्यांनी उपयोग करणे यासाठी पोथी-संशोधनाचे काम प्रबोधिनीने चालवले आहे. प्रबोधिनी-प्रणीत पोथ्याच लोकांनी वापराव्यात असा प्रबोधिनीचा दुराग्रह नाही. पण संस्कारांकडे पाहण्याचा एक योग्य दृष्टिकोण समजून घ्यावा यासाठी प्रबोधिनीप्रणीत पोथ्यांचा प्रयोग करण्याचा आग्रह मात्र असतो. घरच्यांच्या संस्काराच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न शिक्षणसंस्था म्हणून प्रबोधिनी करत असते.
समाजातील विधायक चळवळी
 समाजातील बहुतेक लोक रूढीनुसार किंवा परंपरेनुसार चालणारे असतात. काही थोडे लोक मात्र नवीन करून पाहू इच्छिणारे, नव्या वाटा पाडणारे असतात. एक घटक समाजाच्या स्थैर्यासाठी आवश्यक आहे. दुसरा घटक समाजाच्या प्रगतीसाठी किंवा किमान समाजप्रवाह साकळू नये यासाठी आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक भूमिका रुजवू पाहताना समाजात काही अनुकूल चलन-वलन झाल्याशिवाय ती रुजणे शक्य




(१०) रूप पालटू शिक्षणाचे