पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्योजकतेची कौशल्ये शिकवली पाहिजेत असे प्रबोधिनीला वाटते. यासाठीचे उपक्रम किंवा पद्धती अजून सिद्ध झाल्या नसल्या तरी ग्रामीण भागात तंत्रशिक्षण व उद्योजकता प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. तरच त्यापुढे व्यक्तिमत्त्व विकसनाचा पुढचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला होईल. शहरी भागातही या शिक्षणाचा सार्वत्रिक समावेश होणे उपयुक्त आहे. श्रमप्रतिष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास याचा उपयोग होईल.
 प्रबोधिनीच्या शैक्षणिक भूमिकेमध्ये जेवणदायी शिक्षणाचा विचार अजून चालू आहे। पण तो पूर्णत्वाला पोचलेला नाही. साळुबे येथील ग्रामीण विद्यालयात त्याचे जाणीवपूर्वक प्रयोग चालू आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे मातीशी असलेले नाते समजावे व पारंपरिक व्यवसायातून आर्थिक समृद्धी मिळविण्यासाठी कष्ट करण्याची सवय त्यांना लागावी असे प्रयत्न तिथे चालू असतात. रोपवाटिका, मधुमक्षिका पालन, गांडूळ खतनिर्मिती, वृक्षसंवर्धन हे विषय तिथे असतातच. त्याचबरोबर तंत्रशिक्षण व पशुपालन शिकविण्याचे प्रयत्न तिथे चालू आहेत.
शाळा आणि शिक्षणसंस्था
 देशाचे रूप पालटू इच्छिणाच्या कार्यकत्र्यांची संघटना अशी प्रबोधिनीची खरी ओळख आहे. कार्यकर्ते विकसित करण्याचे प्रयोगही इथे आग्रहाने व प्राधान्याने चालू आहेत, म्हणून प्रबोधिनीची ओळख समाजाला एक शिक्षणसंस्था म्हणून झाली आहे यातही काही वावगे नाही. पण रूढार्थाने ज्यांना शाळा म्हणतात तशी प्रबोधिनी केवळ शाळा नाही किंवा केवळ शाळा चालवणारी शिक्षणसंस्था नाही. घर, शाळा, युवक संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या शिक्षणाच्या चारही माध्यमांना सर्वंकष शिक्षणाचा एक पर्याय प्रबोधिनी देऊ इच्छिते. शाळा आणि युवक संघटना म्हणून केलेले प्रयोग व सिद्ध केलेले उपक्रम मांडण्यापूर्वी प्रबोधिनीने घर आणि सामाजिक पर्यावरण यांच्यासाठी काय पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे हे मांडले पाहिजे.
 पालकांपर्यंत पोहोचण्याचा शिक्षणसंस्थेकडे असलेला मुख्य मार्ग म्हणजे पालकांच्या बैठकी. पालकांच्या बैठकी व पालकांच्या व्यक्तिशः भेटी तर प्रबोधिनीत होतातच. प्रबोधिनीतील अध्यापनाचे प्रयोग समजावून सांगण्यासाठी व शाळेतील व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी यांचा उपयोग होतो. परंतु हे शाळेच्या कामासाठी घराचे सहकार्य मिळवणे झाले. घराच्या शैक्षणिक कामासाठी शिक्षणसंस्था काय करू शकेल असा विचार प्रबोधिनीत चालतो. हा विचार मुख्यत: संस्कार कार्यक्रमांना कालोचित रूप देऊन त्यांचा प्रसार करण्याने कार्यवाहीत येतो.


रूप पालटू शिक्षणाचे(९)