पान:रुपया.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ २ ]

पत्रकापेक्षां एकंदर ५० कोटि रुपये जास्त घेऊन, ते हिंदुस्थानांतून काढून निरनिराळ्या निधीत लंडनमध्ये जमा केले. १९०९ पासन १९१२ पर्यंत चार वर्षांत अदमासे ६३ कोटि शिल्लक राहिली; म्हणजे दरसाल १५ कोटि रुपये खर्चापेक्षा जास्त वसूल केले जातात व नंतर शिल्लक झाली म्हणून जास्त हुंड्या विकून ते इंग्लंडांत नेतात.

 या हुंड्यांच्या विरुद्ध भारतवासी आक्षेपकांचा आणखी एक आरोप आहे. तो महत्वाचा असल्यामुळे, त्यांत किती तथ्य आहे. हे पाहिले पाहिजे. साने किंवा पौंड दिल्यास, रुपये द्यावयाचे असा कायदा केल्यापासून १६ पेन्सांपेक्षा हुंड्यांना जास्त किंमत देण्यास कोणीही कबूल असत नाही, हे वर दाखविलेंच आहे. कारण जास्त दर देण्यापेक्षां पौंड पाठविणे हे फायदेशीर होते. हे पौंड हिंदुस्थानांत आल्याने, रुपयांचे चलन वाढत नाहीं; परंतु हुंड्या विकल्यास रुपयांचे चलन वाढते. त्यामुळे दरसाल रुपये चलनांत जास्त होऊन एकंदर किंमती वाढू लागतात. नामदार गोखले हे या पक्षाचे एक प्रधान अध्वर्यु होते. कृत्रिम चलनाची रेलचेल', ‘चलन पातळ अथवा द्रवीभूत करणे' अशा तऱ्हेची शब्दरचना ते करीत असत. आमच्या मते हे म्हणने सयुक्तिक दिसते; परंतु यावर सरकारी पक्षाचे काय समर्थन आहे ते प्रथम पाहू: