पान:रुपया.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ९०]

तील व नंतर रुपये पाडण्याकरितां, रु खरेदी करण्याकरिता. ते सोने पुनः इंग्लंडमध्ये पाठवावे लागेल अशा तऱ्हेचे दुसरे एक समर्थन ऐकण्यांत येते; परंतु हेही सर्वांशी खरं नाहीं. सोने चलनांत आणण्याची सोय झाल्यास, असे होणार नाही. लोक तच पड चलनांत वापरू लागतील व रुपये पाडण्याचा प्रश्नच उद्भवणार नाहीं. हल्लीच्या लंगड्या पद्धतीमुळे व रुपयास खोटें प्राधान्य दिल्यामुळे, ही आपत्ति उत्पन्न झालेली आहे. सुवर्णचलन केल्यास, हे सर्वच संकट आपोआप नाहीसे होईल. हुंड्या विकल्यामुळे, हल्लीच्या पद्धतीचे कृत्रिमत्व अधिकच दृढ झाले आहे. हुंड्यांची पद्धत बंद करून नवीन स्थापलेल्या इंपीरियल बँकेच्या द्वारे ड्रफ्ट विकणे हा सर्वांत उत्तम उपाय आहे.

 होमचार्जेस कमी करण्यास उत्तम उपाय असा आहे की, नवीन कर्ज नेहमी हिंदुस्थानांत काढावे व पूर्वीचे कर्ज हलके हलके परत देऊन टाकावे. पूर्वी हिंदुस्थानांत कर्ज मिळत नसे अशी सबब असे; परंतु हल्ली हिंदुस्थानांत भांडवल इतके वाढले आहे की, हिंदुस्थानांत कर्ज मिळण्यास मुळीच अडचण पडणार नाहीं. महायुद्ध चालू असतां हिंदुस्थानांत कोट्यवधि रुपयांचे कर्ज काढले हा अनुभव अगदी अलीकडला आहे. तेव्हां या मुद्यासंबंधाने कोणीही साशंक राहण्याचे कारण आम्हास दिसत नाहीं.