पान:रुपया.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[८३ ]

ऐवजी १=२४ पेन्स हा भाव करणे इष्ट होते. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे हुंडणावळीचा दर खालीं होता तो वर न्यावयाचा होता.

 पूर्वी १९०७ मध्ये व १९१४ मध्ये अशा तऱ्हेची स्थिति असतांना उलट हुंड्या' विकल्या होत्या व त्या वेळेला हुंडणावळ वर नेण्याकरिता त्यांचा उपयोग झाला. या समजुतीने सरकारने उलट हुंड्या विकण्याचा सपाटा चालविला. एकंदर ५० कोटींपर्यंत उलट हुंड्या विकल्यामुळे, इंग्लंडांतील निधीमधील सोने इतक्या किंमतीचे बाहेर काढावे लागले; परंतु हे सोनें पूर्वी तेथे नेलें तें पौंडास १५ रुपये या दराने नेले होते. ह्मणजे १ पौंड निधींत जाण्यास आम्हास १५ रुपये येथे द्यावे लागले होते. आता या परत हुंड्या नवीन भावाने विकल्यामुळे, येथे ७।८ रु० दिले म्हणजे १ पौंड तेथे निघींतून द्यावा लागे. अशा रीतीनें प्रत्येक पौंडामागे अदमासे सात रुपये नुकसान झाले. इतके करूनही भाव १ रु० = २ शि० झाला नाहीं तो नाहीच. याशिवाय सोने स्वस्त करण्याकरितां लाखों रुपयांचे सोनेही सरकारने विकलें; परंतु त्याचाही परिणाम झाला नाहीं.

 वरील इतिहासावरून असे दिसून येईल की, सरकारचे हल्लीचे धोरण दोन सिद्धांतांवर अवलंबून आहे. ( १ ) व्यापाराच्या सोईकरितां हुंड्या व उलट हुंड्या विकणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ( २ ) हुंडणावळ कमी झाली ती जास्त करणे हे कार्य उलट हुंड्यांनी घडून येते.