पान:रुपया.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नाणे फक्त सरकारने काढून खुली टांकसाळ बंद करण्याविषयी लॉर्ड लिटन यांजकडे अर्ज केला ; व त्यास अनुसरून १८७८ मध्ये हिंदुस्थान सरकारने स्टेट सेक्रेटरीकडे असे करण्याविषयी मंजुरी मागितली. या खलित्यांत सोन्याचे नाणे प्रचलित करण्याचा आमचा उद्देश आहे असे स्पष्ट नमूद केले होते. कांहीं कारणाकरितां ही मंजुरी स्टेट सेक्रेटरी यांनी दिली नाहीं. १८९२ मध्ये पुन्हां इंग्लिश व्यापा-यांनी तीच हूल उठविली. असे करण्यांत त्यांचा उद्देश असा होता की, रुपयाची किंमत कृत्रिम रीतीने १६ पेन्सांवर आणून या फायदेशीर भावाने आपले रुपये इंग्लंडमध्ये पाठवावे. सरतेशेवटीं, भवति न भवति होऊन, हर्शेल कमिटीच्या शिफारसीवरून हिंदुस्थान सरकारनें खुली टांकसाळ बंद केली. या कमिटीपुढे ज्यांच्या साक्षी झाल्या त्यांमध्ये हिंदुस्थानी मनुष्य एकच होता, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.

 १८९८ सालीं फौलर कमिटीने या व यासारख्या दुसऱ्या सर्व प्रश्नांचा उहापोह करून सोन्याचे चलन व सोन्याचे नाणे करण्याचे ठरविले. सॉव्हरिन हे कायदेशीर चलन ठरवून त्याचे रुपयाशीं प्रमाण १ : १५ असे निश्चित केले. एक सुवर्णनिधि अस्तित्वांत आणला. १८९९ साली या सर्व गोष्टी कायद्याने अमलात आणल्या. सरकारने लवकरच एक सोन्याच्या नाण्याकरितां टांकसाळ सुरू करण्याचे आश्वासन दिले. ही गोष्ट अनिष्ट