पान:रुपया.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ४९ ]

झाले म्हणजे ५/६ आणे फायदा होतो. या कृत्रिम किंमतीमुळे एक महत्वाचा फायदा झालेला आहे तो असा. रुपयाची किंमत त्यांतील धातूवर अवलंबून असती तर, त्याची किंमत दहा आणे झाल्यामुळे एकंदर किंमती अतिशय जास्त झाल्या असत्या; परंतु रुपयास कृत्रिम किंमत दिल्यामुळे ह्या किंमती तितक्या प्रमाणांत नियंत्रित झाल्या. तथापि रुपया हा सोन्याच्या नाण्याशी संलग्न झाल्यामुळे, यूरोपांत जेव्हा जेव्हां किंमती चढतात, त्या वेळेस आमच्या देशांतही कारण नसतां किंमती चढतात. जर रुप्याचेच नाणे हिंदुस्थानांत चालू असते, तर ही दुसऱ्या प्रकारची आपत्ति आह्मांस सहन करावी लागली नसती. किंमतीचा प्रश्न अलाहिदा असल्यामुळे, त्यासंबंधीं या पुस्तकांत यापेक्षा जास्त विवेचन करणे शक्य नाहीं.