पान:रुपया.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ४१ ]

आहे किंवा नाही हा नीतिशास्त्राचा व समाजशास्त्राचा प्रश्न आहे. शेतकी सुधारण्यांत, चांगली घरे बांधण्यांत लोक आपला पैसा खर्च करतील तर, तो जास्त श्रेयस्कर आहे; परंतु या सबबीवर आमच्या हक्काचे सोने इंग्लंडमध्ये किंवा दुसऱ्या कोठेही दाबून ठेवणे हे अन्यायाचे आहे.

 त्याचप्रमाणे चलनांतही पुष्कळ सोने असावे असे कोणाही हिंदुस्थानी अर्थशास्त्रज्ञांचे मत नाहीं. गोखले, थाकरसी, वेब वगैरेंनी सोन्याचे चलन असावे एवढेच मागितले होते. सोन्याचे चलन केल्यावर नोटा न वापरतां, फक्त पौंडावरच व्यवहार करावा व सोने चलनांत अडकून ठेवावे असे त्यांचे म्हणने नव्हते. फक्त या नोटा, हल्लीच्या रुपयांच्या नोटा नसून पौंडाच्या नोटा असाव्या. हिंदुस्थानांत बँकिंगची प्रगति झाल्यावर, आपोआप पौंडांची काटकसर करण्याची व्यवस्था होईल. इंग्लंडमध्ये जरं ही काटकसर होते, मग हिंदुस्थानांत कां होऊ नये ? हिंदुस्थानच्या लोकांची सोन्याचे नाणे संचय करून ठेवण्याची प्रवृत्ति आहे हे खरे आहे ; तथापि ही संवय नाहींशी करण्यास दुसरे मार्ग आहेत. त्याकरितां हल्लींची धेडगुजरी चलनपद्धति कायम ठेवणे हा उपाय नव्हे.

 आतां रुपयांसंबंधी विचार करू. १८९३ मध्ये टांकसाळ बंद केल्यानंतर १९०० पर्यंत नवीन रुपये मुळीच पाडले नाहींत. १९०० पासून पुनः रुपये पाडण्यास सुरवात केली. १९०७ मध्ये हुंडणावळ विरुद्ध असल्यामुळे, पुष्कळ रुपये चलनांतून कमी झाले.