पान:रुपया.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२२७)


दुसरा मार्ग नसल्यामुळे, नोटा काढणं आवश्यक झाले व पूर्वीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्याशिवाय या नवीन नोटा काढतां येत नस- ल्यामुळे त्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करून, रुपयांचा आधार नस- तांही नोटा काढण्याची परवानगी सरकारने घेतली.त्यामुळे चलनांत १२५ कोटि नोटा अधिक आल्या.त्यामुळे एकंदर चलन इतके वाढले आहे की, त्याचा परिणाम किंमतीवर झाल्या- शिवाय राहिला नाहीं. हल्लींच्या मित्तीस एकंदर चलनांत अद- मासे २५० कोटि रुपये व १७५ कोटींच्या नोटा आहेत हे पूर्वी सांगितलेच आहे. अशा रीतीनें एकंदर चलन ४००।४२५ कोटींचें झाल्याने व व्यापारधंदा, उद्योग व आर्थिक उत्पादन स्थिर असल्यानें, रुपये जास्त व वस्तु कमी असे होऊन, त्यांचे गुणो- त्तर बदलले आहे.
 यास उपाय एकच आहे. तो हा की, सिक्यूरिटींच्या आधा- रावर नोटा काढण्याचा कायदा रद्द करून, पूर्वीप्रमाणे रुपयांच्या आधारावर नोटा काढण्याची पद्धति पुनः अमलांत आणिली पाहिजे. महायुद्धाचे पूर्वी २० कोटि रुपयांच्या नोटा सिक्यू- रिटींच्या आधारावर काढितां येत असत. ही मर्यादा फार तर ३० कोटींवर न्यावी; परंतु यापेक्षा अधिक नोटा काढणे झाल्यास रुपये अथवा सॉव्हरिन नोटांच्या निधीमध्यें ठेविल्याशिवाय चालणार नाही असा कायद्याचा निर्बंध पाहिजे. असे केल्याने नोटांची वाढ अमर्याद होणार नाहीं व किंमतीवर अनिष्ट परिणाम होणार नाहीत.