पान:रुपया.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( १०१ )

रुपयांमधूनच ते द्यावे लागतात. इंग्लंडांतील शिल्लक, नेहमीच्या व्यवहारापुरती बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवलेली असते. व ही अदमासे ७५ लक्ष रुपयापर्यंत असते. याशिवाय बाकीची शिल्लक थोडक्या मुदतच्या व्याजाने कर्जाऊ दिलेली असते.

 रुपयांचा मोठा सांठा, नोटांचा निधि व सुचणंचलन निधि या दोन निधीमध्ये ठेवलेला असतो. पौंडाचा साठा या दोन निधींमध्ये असतो व शिवाय इंग्लंडमधील शिलकेंत असतो. हा सर्व रोख असत नाहीं; कांहीं कर्जाऊ दिलेल्या रकमेच्या स्वरूपांत असतो व कांहीं सिक्यूरिटीच्या रूपांत असतो. परंतु कर्जाऊ रकमा महिन्या दोन महिन्यांच्या आंत वसूल करता येतात. व वेळ पडल्यास सिक्यूरिटी विकतां येतात.

 हे निधि आपले कर्तव्य बजावण्यास समर्थ आहेत किंवा नाहींत हे आतां पाहिले पाहिजे. हे पहाण्यास ज्या वर्षी या निधींवर सत्त्वपरीक्षेचा प्रसंग आला त्या वर्षांचा इतिहास सूक्ष्मरीतीने अवलोकन करणे श्रेयस्कर आहे. त्यानंतर त्यांची नेहमींची स्थिति काय आहे हे पहातां येईल. १९०६ पासून १९०८ पर्यंत असे प्रसंग सारखे येत गेले. १९०० पासून १९०५ पर्यंत रुपयांची मागणी साधारण होती. या पांच वर्षांत अदमासे ४२ कोटि रुपये नवीन पाडले; परंतु विशेष टंचाई केव्हांच भासली नाहीं. १९०५ च्या जुलई महिन्यांत एकंदर शिलक १८ कोटि होती.