पान:रुपया.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रकरण ६वें
सुवर्णचलननिधि, नोटांचा निधि व खजिन्यांतील शिल्लक.
( Reserve and Cash balances. )

 फौलरकमिटीने सोन्याचे नाणे करण्याचे ठरविल्यानंतर, हे नाणे करण्यास सोन्याचा सांठा पाहिजे तो जमविण्यास सुरवात केली. टांकसाळींत रुपये पाडल्यास रुप्याचा भाव स्वस्त असल्यामुळे, प्रत्येक रुपयामागे अदमासे पांच आणे नफा होतो. हा नफा दुसऱ्या कोणत्याही कामाकरितां न वापरतां, तो एका निधींत अलाहिदा ठेवू लागले. या निधीचें नांव सुवर्णनिधि ( Gold Reserve ) असे ठेविलें. १९०६ मध्ये या निधीत रोख रुपये ठेवू लागल्यामुळे, त्याचे नांव बदलून सुवर्णचलननिधि ( Gold Standard Reserve ) असे त्यास म्हणू लागले.

 १९०० पासून १९०७ पर्यंत या निधींत बरीच रक्कम जमली होती; परंतु १९०७ मध्यें उलट हुंड्या विकल्यामुळे, रुपये चलनांतून निघून सरकारी खजिन्यांत सांचले. त्यामुळे १९१२ पर्यंत पुनः नवीन रुपये पाडण्याचे काम पडलें नाहीं. त्या मित्तापर्यंत हा निधि २४,९० लक्षांपर्यंत गेला होता व याचे व्याज ४,८० लक्ष, मिळून एकंदर २९,७० लक्ष रुपये यांत जमले होते. १९१२ मध्ये पुष्कळ रुपये पाडल्यामुळे, १९१३ च्या सुरवातीस हा निधि ३४,५० लक्षपर्यंत गेला. याचा तपशील असा होताः