पान:रुपक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मनोगत


डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ! रंग, गंध, शब्द ( श्रुती), रस आणि स्पर्श ! पंचेंद्रियातील या सर्वच घटकांचा वापर सृजनामध्ये नेहमीच होतो. स्पर्श ही खासगी गोष्ट. दोन व्यक्तींमध्ये घडणारी. पण त्यातून भावनांचे प्रकटीकरण होणे आणि त्यातून नाट्य जन्माला येणे विरळा. प्रेमानं, मायेनं, ममत्वानं, आस्थेनं, काळजीनं आणि तत्सदृश्य सद्भावानेनं केलेल्या स्पर्शाचं महत्त्व आहेच. मात्र, स्पर्शातील विकृतीतून संघर्ष निर्माण होतो, चिं. त्र्यं. खानोलकरांच्या 'अजगर'मधून तो प्रकट झाला आहे. 'रूपक'मधून त्याचं आणखी वेगळं स्वरूप मांडलं आहे.
 आई - वडिलांनी आपल्या अपत्याला केलेल्या स्पर्शात अनेक अर्थ दडलेले असतात. मुला-मुलींचं आयुष्यच त्यातून उभं राहतं. विजयाप्रमाणेच पराभवातही ते उमेद देतात, जगण्याची प्रेरणा देतात. दुसरीकडं, आयुष्यभर एकमेकांच्या संगतीत जगलेल्या जोडप्यांना एकमेकांना हवा असलेला आश्वासक स्पर्श एकदा तरी करता येईलच असे सांगता येत नाही. आसन्नमरणावस्थेत असलेली पत्नी नवऱ्याकडून तिला हव्या असलेल्या स्पर्शासाठी आपला प्राण तगवून धरत असल्याचे उदाहरण नवे नाही. स्पर्श जीवनदायी असतो, तसा तो हिंसेला प्रवृत्त करणारा, विघातकही असू शकतो. स्त्रीच्या मनात पुरुषाच्या स्पर्शाचं नेमकं रूपक काय असेल हे सांगता येणं कठीण आहे. तो व्यक्तिगत अनुभूतीचा भाग आहे. त्यात संस्काराचा, मूल्याचा भाग असू शकेल. तसा तो नसेल तर गोष्टी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वास्तव नाकारता येत नाही.
 पिढी बदलली म्हणून मूल्ये बदलत नसतात. ती चिरंतन असतात. निरामय जगण्यासाठी मूल्यांचा आधार महत्त्वाचा ! 'रूपक' हे दोन पिढ्यांमधील अंतर दाखवणारे नाटक आहे. मूल्ये आणि संस्कारांना अधोरेखित करतानाच त्यांच्या अभावाने जे घडते ते किती विदारक असू शकते, याचे दर्शन त्यातून घडवले आहे. नाटकाची लांबी-रूंदी हा त्याचा पैस नसतो तर त्याचा आशय, त्याची व्याप्ती आणि काळाच्या कसोटीवर तो टिकून राहण्याची त्याची क्षमता महत्त्वाची. नाटकाची भाषा, रचना आणि मांडणी या तांत्रिक कौशल्याच्या गोष्टी आहेत. तथापि, या तंत्रकौशल्याचा अभाव अनेक दर्जेदार आशयाला मारक ठरतो. नाटक रंगमंचावर दिसतं त्याच्याआधी आणि त्याच्यानंतरदेखील घडत असतं. वेधक दृश्यं, भावनिक प्रसंग, उठावदार व्यक्तिरेखा गरजेच्या असतातच, मात्र नाटकाच्या कथावस्तूच्या आगेमागे घडणारा अवकाशदेखील तपासावा लागतो.
 स्पर्श ही गोष्ट अत्यंत खाजगी आणि गुंतागुंतीची आहे. लहानपणीच पुरुषाच्या विशिष्ट स्पर्शाबद्दल एखाद्या मुलीच्या मनात निर्माण झालेली तिरस्काराची भावना तिच्या हातून टोकाची कृती तिच्या हातून घडवू शकतो. स्पर्शातून घडणाऱ्या संघर्षातील नाट्य शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
 'रूपक' नाटकात दोन पिढ्यांच्या मानसिकतेचाही उहापोह केला आहे. पहिली पिढी संस्कार आणि मूल्यभान जपणारी आहे. आपल्या पुढच्या पिढीतील मुलांनी आपण जसे जगलो, जी मूल्ये जोपासली ती त्यांनी जपावीत असं वाटतं. पण नव्या पिढीतील तरूणाईची मानसिकता वेगळी आहे. शारीरिक आणि लैंगिक भूक त्यांच्या दृष्टीने एकाच