पान:रुपक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामावला आहे. अर्थातच पात्रसंख्येवर किंवा संहितेच्या लांबीरूंदीवर नाटकाचे मूल्यमापन करता येत नाही. आजकालच्या नाटकांमध्ये या नाटकांने प्रस्थापित केलेला आपला अक्षांश-रेखांश सुजाण प्रेक्षकाला निश्चित देखणा वाटावा असा आहे. 'रूपक' नाटक एका मध्यमवर्गीय जाणिवेतून उभं राहतं. पण या मध्यमवर्गीय माणसांमध्येच असणारा वृत्तीसंघर्ष नाटककाराला दिसतो, जाणवतो आणि व्यक्त व्हायला भाग पाडतोही. वृत्तीसंघर्ष कसा भावनाट्याला कारणीभूत होतो ते नाटकातल्या अखेरच्या सहज परंतू मार्मिक संवादांतून प्रेक्षकांसमोर येतं. पात्रांच्या वृत्तीतून उभं राहणारं हे भावनाट्य एका टोकाला जातं, माणूसपणाचं नवं दर्शन घडवतं ते नाटकातील लता- बापूच्या एका लोभापायी केलेल्या रूपातील हिंसक वृत्तीतून. नाटककारानं रूपाच्या तोंडचे संवाद जे लिहिलेले आहेत त्यातून वर्तमानाच्या कालसापेक्षतेची, समाजप्रवाहाच्या स्वार्थकेंद्री दिशेची, व्यक्तीच्या यशस्वी मूल्यांच्या प्रस्थापिततेची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्परांतल्या नात्यातल्या अवकाशाच्या अधोरेखनाची - एका नव्या रीतीची अत्यंत सूचक अशी बांधणी प्रेक्षकाला जाणवते. तो अस्वस्थ होतो. प्रश्नांकित होतो आणि अखेरीस अंतर्मुख होऊन 'स्व'शी जोडलेल्या साऱ्या नात्यांना नव्याने निरखू लागतो. हे या नाटकाचे संहितेच्या अंगाने असलेले यश आहे. आपले जगणे म्हणजे 'स्वेतरा'शी असलेले नाते असते. हाच खरंतर 'स्व'च्या असण्याचा अर्थ असतो. या नाटकातील रूपाचा एक संवाद पाहिला तर रूपाच्या वृत्तीचा आशय प्रेक्षकांना कळावा :
 " पुरे झालं. मी तुला आईसारखी समजून मॉम म्हणत होते. तुझ्यात मला आई दिसते. माझ्या खऱ्या बापाला मी पाहिलं नाही. म्हटलं, हे चांगलं घर मिळालंय आपल्याला. माझ्या आईचीही काळजी संपली; इथं तुमच्याकडं मी राहतीय म्हटल्यावर ! वेळोवेळी मी पाँईंटआऊट करत होते बॅप्सचा टच!"
 स्पर्श केवळ शारीरिक नसतो, तो आपल्या अखंड असण्यातून जन्मतो. हे स्वार्थप्रेरित बुद्धीला कसं आकळावं? अशा रूपाच्या बुद्धितून संवाद घडत राहतात आणि अखेरीस एका वृत्तीसंघर्षाचे कारण ठरतात. हेच तर सामान्यांच्या आयुष्यात घडणारं नाट्य असतं. ते कृत्रिम कुठं असतं ? त्याचा जन्म जगण्याच्या प्रवाहीपणातून होतो. हे नाटकातले नाटककाराचे वरवरचे संवाद कौशल्य नाही तर कालसापेक्ष अभावाचा तो एक कलात्मक नाट्याविष्कार आहे. संहितेमध्ये शब्दांना, संवादांना, चिन्हांना, कंसातील सूचनांना केवढे महत्त्व असते ! रजनीश जोशींना त्याची पुरेपूर जाण आहे. या नाटकाचा प्रयोगही सादरीकरणास अनुकूल आहे. प्रयोगानुकूल नेपथ्य, मोजकीच पात्रसंख्या आणि अतिशय सुटसुटीत केवळ मनोविश्लेषणाच्या अंगानं विकसित होणारी संहिता. याहून दिग्दर्शकास अधिक काय हवे असते ? नाट्यप्रयोगातील तीनही पात्रांना मात्र शब्दप्रधान संहितेची सार्थ जाणीव हवी. मानसिक आंदोलने संवेद्य करण्याची कायिक अभिनयक्षमता हवी. या आशयसंपन्न नाटकाचा प्रयोग व्यावसायिक बाजासह व्हावा, कारण हे एक प्रभावी प्रयोगमूल्य असलेले आजचे नाटक आहे.

हेमकिरण पत्की, सोलापूर