पान:रुपक.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पातळीवर आहे. आचार-विचाराच्या पातळीवर असे भेद मागच्या अनंत पिढ्यांपासून चालत आलेले आहेत, ते पुढेही बदलत राहणार, यात काय शंका? कोणतीही पिढी आपल्या भवतालाचा विचार करून पुढे जात असते. काल काय घडले याच्यावर ती थांबून राहत नाही.
 'रूपक'चा प्रयोग सोलापूरात झाला. प्रदीप कुलकर्णी, शोभा बोल्ली आणि कु. अष्टपुत्रे यांनी आपापल्या भूमिका ताकदीने सादर केल्या. त्यानं रसिकांना आणि मलाही समाधान दिले. गुरू वठारे या प्रयोगाचे सूत्रधार होते. नाटकाच्या निर्मितीमूल्यात कोठेही तडजोड न करता त्यांनी हा प्रयोग सुविहितपणे घडवून आणला. त्यामुळे या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
 रविकिरण पोरे आणि निशांत पोरे हे प्रगल्भ कलावंत आहेत. समकालिन घडामोडींशी ते केवळ संबद्ध आहेत, असे नाही तर त्यांच्या कलाजाणिवाही प्रगल्भ आहेत. 'रूपक'चे पुस्तक होण्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे. निशांतने आशयसमृद्ध असे मुखपृष्ठ केले आणि पुस्तकाची देखणी मांडणीही केली. कवी हेमकिरण पत्की हे माझे जवळचे मित्र, नाटक आणि नाटककाराला समजून घेण्याची त्यांची रीत न्यारी आहे. 'रूपक' वाचून त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. या तिघांचे मी ऋण व्यक्त करतो. कविराज लक्ष्मीनारायण बोल्ली हे माझ्यापेक्षा वयाने मोठे, पण आमच्या पंचवीस वर्षांच्या मैत्रीत त्यांनी आपल्या वयाचे आणि कवित्वाचे मोठेपण कधीच जाणवू दिले नाही. निरपेक्ष स्नेहभाव आणि अकृत्रिम प्रेमाने आमच्यातील जिव्हाळा समृद्ध झालेला होता. हे पुस्तक त्यांना अर्पण करताना अंतःकरण जड झाले आहे.
 नाट्यलेखनाच्या कालखंडात आणि एकूण प्रापंचिक व्यवहारात माझी पत्नी रेवतीने दिलेली साथ अमूल्य अशीच आहे. गुरूराज आणि गिरिराज या माझ्या मुलांनीही माझे नाट्यवेड समजून घेतले आहे, याचा मुद्दाम उल्लेख आवश्यक आहे. नाटकाची संहिताही वाचकांना आवडेल, अशी अपेक्षा आहे.

रजनीश जोशी, सोलापूर