पान:रुपक.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना


नाटकाच्या अंतरंगात प्रवेशताना...!
 आजकालच्या नाटकांवर आपण जेव्हा दृष्टी टाकतो तेव्हा आपल्याला आधीच्या नाटककारांचं स्वाभाविक स्मरण होतं. त्यात तेंडुलकर, एलकुंचवार, मतकरी अशी नाटकाच्या प्रयोगात आणि संहितेत बदल करणारी महत्त्वाची नाटककार मंडळी दिसतात. त्यांनी जे रंगभूमीवरलं नाटक प्रयोगशील केलं, अधिक प्रेक्षकसन्मुख केलं, त्या गोष्टीची दखल घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. कारण नाटकाच्या संदर्भातली ही प्रयोगशीलता अगदी संहितेच्या गाभ्याला भिडणारी होती. म्हणूनच विजयाबाई मेहता असोत, पं. सत्यदेव दुबे असोत यांसारख्या नाटकाच्या दिग्दर्शकांना नाटकाचे वेगवेगळे घाट बांधता आले. त्या काळात असलेलं नाटककार आणि दिग्दर्शक यातलं सौहार्द एकूणच नाट्यसृष्टीला नवं भान देणारं ठरलं. नवं नाटक म्हणजे संहितेचा नवा आशय- विषय आणि नवा प्रयोग म्हणजे इथल्या मातीतल्या लोककथा किंवा पुराणकथांचे वर्तमानातल्या स्थिती-गतींना जोडून घेणारे प्रयोगक्षम घाट. या नवेपणामुळेच त्याकाळातल्या आणि नंतरच्या प्रेक्षकांना व्यापक आकलनाची दिशा लाभली.
 नाटकाच्या प्रयोगांचा विकास काळाच्या कुठल्याच टप्प्यावर कधीच थांबत नसतो. काळ पुढं सरकतो तशा नाटकाच्या संहिता आणि त्यांचे प्राणदार प्रयोग एक व्यापक कालसापेक्षता घेऊन पुढं पुढंच प्रवासत असतात. समाजाचा प्रवाह बदलत असतो. लोकमान्यता बदलत असते. विचारांच्या दिशा, समस्यांचे स्वरूप हे सतत बदलतच असते. हे बदल कधी स्थूल स्वरूपाचे असतात तर कधी अत्यंत सूक्ष्म आणि जटिल स्वरूपाचे असतात. समाजाच्या या प्रवाहाला जाणून घेणारा आणि स्वाभाविकतेनं त्याला व्यक्त करणारा नवा नाटककारांचा वर्ग पुन्हा निर्माण होत असतो. त्यात मकरंद साठे, तुषार भद्रे, अतुल पेठे, शफाअतखान वगैरे नाटककार आपल्याला ठळकपणे जाणवतात. मागच्या पिढीकडून पुढची पिढी केवळ कालसापेक्ष दृष्टिकोन बदलून घे नाही. नवी आत्मनिष्ठा आणि समाजनिष्ठा यांचा एक कलात्मक समतोल साधण्याचे कामी ती करते. यातूनच आशयसंपन्न नाटकाची परंपरा निर्माण होत असते. कुठल्याही कलेच्या क्षेत्रातील परंपरा साचलेपण, एकारलेपण, ठराविकपण यांचे बांध ओलांडून पुढं वाहत राहते. तीच नवतेला जन्म देते. परंपरा मुळातून जाणल्याशिवाय नवता जन्माला येत नाही, हे प्रयोगशील कलावंताला सहजपणे जाणता येते.
 रजनीश जोशी हे सोलापूरचे नाटककार आहेत. पण हे नाव काही सोलापुरातील नाट्यक्षेत्रापुरतं मर्यादित नाही. त्यांनी राज्यपातळीवरल्या कित्येक नाट्यस्पर्धांतून, एकांकिका स्पर्धांतून आपला सृजनशील सहभाग नोंदविला आहे. कित्येक पुरस्कारांचे ते मानकरीही ठरले आहेत. एखादं आशयघन नाटक लिहावं, त्याचा रंगभूमीवरला प्रयोग सुजाण प्रेक्षकांसाठी करावा, व्यावसायिक रंगभूमीसाठी करावा हे त्यांनी प्रयासाशिवाय पेललं आहे.
 'रूपक' हे त्यांचं एक नवं नाटक आहे. एकूण सहा प्रवेशांच्या या नाटकात रंगभूमीवर वावरणारी अवघी तीन पात्रं आणि एक केवळ त्यांच्या संवादातून सूचित होणारं असं पात्र आहे. एवढ्या छोट्या आकाराच्या या नाटकात एक पूर्ण प्रयोग