पान:रुपक.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू: रूपाच्या आठवणीत या खोलीतला तिचा वावर, मोबाईल फोन
 कानाला लावून घरभर फिरण्याची तिची स्टाईल, बॅप्स ऽ ऽ म्हणून
 हाक मारण्याची तिची पध्दत. थकून गेली दिवसभराच्या भिरभिरीनं
 की या इथं कोचात शांत पडून राहायची. रूपा म्हणजे चैतन्य, रूपा
 म्हणजे सळसळता उत्साह ! या घराचा प्राण ! ती आली की घर
 उजळून जायचं. तिच्या ऑर्डर्स 'चहा कर,' 'ब्रेकफास्टला
 पावभाजी कर' 'मोबाईलचा सेट बदलून घे,' 'बिथोवनच्या सिंफनीज्
 लावं' एक ना दोन! रूपानं माझं म्हणून काही ठेवलं नव्हतं आणि तिचं
 स्वतःचं म्हणून काही राखलं नव्हतं. आपल्या घराचं अस्तित्व होतं रूपा म्हणजे !
लता: ओ. के. बापू, तू किती वेळ तेच तेच उगाळत बसणार आहेस.
 मला वाटतं, आपण आणखी कुणाला ठेवू या 'पेईंग गेस्ट' म्हणून.
बापू : (खवळतो) बकवास करू नकोस.
लता: बकवास काय त्याच्यात. मान्य आहे तू थोडा गुंतला होतास रूपामध्ये.
 गेली ती. म्हणून पुन्हा दुसऱ्या कुणाला 'पेईंग गेस्ट' ठेवायचंच नाही असं
 नाही ना ?
बापू: (संतप्त) यू फूल. रूपाची जागा कोणीही घेऊ शकणारं नाही.
लता: एक्झॅक्टली. रूपाचं आपल्या मनात असलेलं स्थान अबाधित राहील.
 त्याला धक्का द्यायचा नाही.
बापू: तो कोणी देऊही शकणार नाही.
लता: करेक्ट. मग पुन्हा अँड देते पेपरात. कुणीही चांगली मुलगी घेऊ आपण.
बापू: मुळीच नाही. रूपाच्या खोलीत कुणी दुसरी जाणार नाही.
 मला खपणार नाही ते. ही रूपाची खोली आहे आणि तिचीच राहणार.
लता : लहान मुलासारखा हट्ट करतोयस तू.
बापू: हट्ट काय त्यात ?
लता: हट्टच ! रूपा गेल्यापासून तू तिच्याशिवाय दुसऱ्या विषयावर बोललास
 का माझ्याशी ? मान्य आहे तू तिला मुलीसारखं ट्रीट करत होतास.
 म्हणून काय कायम तिलाच कवटाळून बसणार आहेस का ?


रुपक । ४९ ।