पान:रुपक.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू: मी त्याला कारणीभूत होतो. कशाला मी तुला स्कूटरवरून नेलं
 आणि कशाला तो अपघात झाला !
लतातो खड्डा तुला दिसला नाही.
बापू: तू तीन-चार महिन्यांची गर्भवती होतीस याचं तरी भान ठेवायला होतं.
 तुला मी....
लता:तू छान सांभाळतच होतास मला. आपण तेव्हा डॉक्टरकडंच निघालो होतो.
बापू: तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी घेण्यासाठी निघालो आणि
 काळजीचं कारण कायमचं नाहीसं झालं !
लता: माझ्या जीवावर बेतलेला तो अपघात तुझ्या शुश्रुषेमुळे सुसह्य झाला.
 किती सांभाळलंस मला.
बापू: पण त्यामुळं तुझं मातृत्व हिरावलं ना मी.
लता: तू त्याला जबाबदार नाहीस बापू. पुन्हा चान्स घेतला तर माझ्या
 जीवाला धोका आहे, असं म्हणाले डॉक्टर म्हणून आपण त्याच्या वाटेला गेलो नाही.
बापू: आणि वांझपणाचा शिक्का तुझ्या कपाळावर उमटला.
लता: सगळ्या गोष्टी झाल्या आता. तू उगाच जुन्या खपल्या उकरू नकोस.
बापू: माझ्या चुकीमुळं तुझी किती हानी झाली. त्याची भरपाई कशी करू सांग !
लता: आजवर किती मायेनं सांभाळलंस मला. कशाची ददात नव्हती
 मला; आणि नाही !
बापू: एखादी मुलगी असावी असं कितीदा तू बोलून दाखवलंस. खूपदा
 तर मध्यरात्री झोपेतही तू बरळायचीस. मीच तर जागं केलं तुला अनेकदा !
लता: बापू, 'पेईंग गेस्ट' म्हणून एखादी मुलगी घरी सांभाळण्याची
 कल्पना त्यातूनच निघाली ना ?
बापू: हो. तेवढयासाठी रूपाला आपण जीवापाड सांभाळत होतो. तिला
 हवं नको पाहात होतो.
लता: अगदी आपल्या मुलीसारखं तू वागवलंस तिला.
बापू: नाही कळलं तिला ते ! माझ्या मनात खोट नव्हती ग !


रुपक । ४७ ।