पान:रुपक.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता :बिचारी तानूताई. आनंदसुध्दा पचवता आला पाहिजे.
बापू : तिनं बाळाला असं उंच फेकत झेलायला सुरूवात केली आणि
 तिसऱ्या की चौथ्या वेळेस त्याला झेलायचंच विसरली .......
लता : आई ग ऽ नको सांगू नकोस पुढचं !
बापू : तानूताईची आठवण तूच काढलीस.
लता : काढली, पण तिच्या घोड्यावरून रपेटीच्या सवयीबद्दल बोलशील
 असं वाटलं.
बापू : नातवाशी झेलाझेली केल्याचं तूच म्हणालीस..
लता :तानूशी आता तीच आठवण निगडीत आहे. पण एखाद्या तगड्या
 जवानाला लाजवेल अशी घोडेस्वारी ती करायची.
बापू : चार वर्षानंतर तुरूंगातून सोडलं तिला. आणि पुढच्याच वर्षी
 वारली ती.
लता : अगदी वेगळीच होती ना रे ती. तिचा आनंद, उत्साह कुणाला
 समजूनच घेता आला नाही.
बापू : माझंही तसंच झालंय असं म्हणायचंय का तुला ?
लता : तुझं ? तुझं कुठं काय ?
बापू :लता, तुला काय कमी त्रास दिलाय का ?
लता : (विषयाला बगल देत) चल काहीतरीच.
बापू : लता, तानूताईच्या आठवणीनं तू कसनुशी होतेस. बाळाला पकडलंच
 नाही. रक्ताची बाटली फरशीवर आपटून फुटावी, तसं झालं सगळं.
 आणि मी...
लता : तुझा काय संबंध आहे त्यात ? तानूताईचं अवधान सुटलं होतं.
 आनंदाच्या गर्तेत सापडल्यासारखं झालं होतं तिला.
बापू मीही तसाच भिरभिरलो होतो. लता, मला ठाऊक आहे. तुझ्या
 वांझपणाला मी कारणीभूत आहे.
लता : (कानावर हात ठेवते) काहीतरी बोलू नकोस. वांझपणा काय ?
 कसला अभद्र शब्द वापरलास !
बापू : तुझ्यासाठी नाही. माझ्या मुर्खपणाला लागलेलं ते दुःखाचं अस्तर आहे.
लता : का स्वतःला कोसतोस ? जे झालं तो एक अपघात होता.


रुपक । ४६ ।