पान:रुपक.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 पाहिलंच नाही. म्हटलं, हे चांगलं घर मिळालं आपल्याला. माझ्या
 आईचीही काळजी संपली; इथं तुमच्याकडं मी राहतीय म्हटल्यावर !
 वेळोवेळी मी पॉईन्ट आऊट करत होते बॅप्सचा टच !
बापू  : रूपा, मुली तू काहीतरी गैरसमज करून घेतेयस.
रूपा : तो गैरसमज असावा असं मी मनाशी म्हणत होते. तसं असतं तर
 किती बरं झालं असतं. घरीदारी सगळीकडं तोच अनुभव. रस्त्यानं
 फिरताना, बागेत, बसमध्ये...... जिथं जिथं म्हणून माणसाची वर्दळ
 असते, तिथं सर्वत्र हा स्पर्श दबा धरून जणू माझ्या येण्याची वाट
 पाहायचा. बाहेरचे धक्के मी पचवले, परंतु घरातला हा अनुभव
 मला पेलणं शक्य नाही.
लता : रूपा, आमचं सहजीवन आता पंचवीस वर्षाचं आहे. बापूच्या प्रत्येक
 हालचालीतला अर्थ मी जाणून घेतलाय. निदान बापूवर तरी तू असा
 आरोप करायला नको होता.
रूपा: (ओरडते) आरोप नाहीये हा ! ही वस्तुस्थिती आहे. (संतुलित पण
 कबेर आवाजात) वयानं लहान असले तरी मोठेपणाचे अनेक
 अनुभव मी घेतले आहे. आमच्या गावाकडच्या घरात, माझ्या
 मित्र-मैत्रिणींबरोबर खेळताना होणारे स्पर्श, कॉलेजात शिकताना
 वहया-पुस्तकांची देवाण घेवाण करताना केले जाणारे जाणीवपूर्वक
 स्पर्श, रस्त्यानं जाताना गर्दीत अभावितपणे झाल्याचं दाखवत मुद्दाम
 केला जाणारा चिकटूपणा, यातला फरक मला चांगला कळतो.
 अगदी आमच्या शेजारच्या काकांनी स्तोत्रं म्हणताना शाबासकी
 म्हणून केलेला आणि बऱ्याचदा शिक्षा म्हणून केलेल्या स्पर्शातली
 रखरखीत जाणीव मी मनाशी बाळगून आहे. राघू माझा प्रियकर,
 पण त्यालाही मी विशिष्ट अंतरावर रोखून धरलंय. या सगळया
 स्पर्शकल्लोळात मला आश्वासन फक्त त्याचं आहे. आणि तरीही मी
 त्याला नाही बिलगू शकत. माझ्या रंध्रारंध्रात 'आपल्या परक्या'
 स्पर्शाची विलक्षण सरमिसळ झालीय. माझी त्वचा मलाच कधी
 कधी छिलून काढावीशी वाटते. कधी कधी माझं स्त्रीत्व माझ्या
 सगळ्या जाणिवांवर पांघरूणासारखं आच्छादन घालतं. 'हे मी
 सहनच करायचं', 'हे मी भोगलंच पाहिजे', अशा दुर्गंधीयुक्त फुंकरीनं
 स्वतःला समजावत राहायचं? नाही, मला हे मान्य. बऱ्याचदा


रुपक । ३६ ।