पान:रुपक.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 हातात मॅजिक पाईपही आहे. त्याच्याशी खटाटोप करताना तो हातात
 फुटतो आणि ती खाली पडते. त्या आवाजानं बापू लता दोघेही आत
 पळत जातात. रूपाला खाली कोसळल्यानं चांगलाच मुका मार
 लागलाय. बापू-लता तिला सावरतात. )
बापू  : रूपा, एक मिनिट, हे बघ पाय सरळ कर.
लता  : हो, एकदम अंग आखडू नकोस. थोडा ताण दे.
बापू  : ( तिला धरून शुश्रुषा करत) काही नाही, बरं वाटेल. (रूपा बापूला
 बाजूला करायचा प्रयत्न करतीय, पण बापूला तिचं शरीर दुखतंय
 असं वाटतंय. तो हलकेच दुखावलेल्या भागाला मालिश करतोय.
 तिच्या तोंडातून वेदनेनं शब्द फुटत नाही. रूपा कण्हतीय)
लता  : थांब, मी पाणी देते तुला. (ती शेजारच्या टीपॉयवरचा पाण्याचा जग
 पाहते, तो रिकामा. ती पटकन स्वयंपाकघरात जाते. बापू रूपाला बरं
 वाटावं म्हणून हळूहळू तिचं अंग दाबतोय. रूपाला ते असह्य होतंय,
 त्यामुळं ती तळमळतेय. बापू तिच्या वेदना वाढल्या समजून
 तिच्यावर उपचार करतोय.)
रूपा : (हाताने इशारा करत) नको, नको.
बापू  : काय नको. तू जरा शांत राहा. बरं वाटेल तुला. मी डॉक्टरांना फोन
 करतो.
रूपा : (कसं बसं ) नको !
बापू  : (फोनकडं चाललेला, परत तिला घरत) ओ.के. आधी तू शांत हो.
 मी नंतर फोन करतो. रिलॅक्स बेबी.
 (पुन्हा तिला हळूवार मालिश करतोय)
रूपा  : (निकराने) नको रे !
 (लता पाण्याचा ग्लास घेऊन आलेली. ती रूपानं बापूला
 झिडकारलेलं पाहते. काहीशी चकित होते. )
लता  : हं, रूपा हे पाणी पी थोडं. बरं वाटेल.
 (रूपा तिच्या हातून पाणी पिते. इतक्यात रूपाचा मोबाईल वाजतो.
 बापू तत्परतेनं घेतो. त्यावरचं नाव वाचतो 'राघू' )
रूपा  : इकडं आणं !
बापू : (प्रेमानं तिला देत) घे.

रुपक । ३१ ।