पान:रुपक.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कॉलसेंटरमध्ये बोलत राहायचं.
लता: हे बघ बापू, कंपनीत काय आणि कसं बोलायचं याचे धडे गिरवलेत
 रूपानं ! त्याच्या बळावरच तिला ही नोकरी मिळालीय. फक्त कुठं
 कसं बोलावं याचा पोच नाहीये.
बापू: तू पुन्हा आठवण नको करून देऊ तिच्या बोलण्याची.
लता: आठवण करून देण्याचं कारणच नाही, तू अस्वस्थ आहेसच ना ?
बापू: माझ्या अस्वस्थतेचं ते कारण नाही-
लता: मग काय आहे ?
बापू: पोरीला जगाचा अनुभव नाही -
लता: तो देण्याचा मक्ता तू घेतलायस का ?
बापू: मक्ता घेण्याचा प्रश्न नाही, आपली काही जबाबदारी आहे ना ?
लता: नसत्या जबाबदाऱ्या नकोस घेऊ ओढवून.
बापू: (खवळत जातोय क्रमाक्रमानं) नसत्या जबाबदाऱ्या काय ?
 तिच्या भल्याचं नको का पाहायला ?
लता: तू जरा जास्त वाहवत जातोयस ?
बापू: वाहवत जातोय ? म्हणजे ?
लता: तरूण मुला-मुलींचं आपलं जग असतं. त्यात ढवळाढवळ
 केलेलं आवडत नाही त्यांना!
बापू: ढवळाढवळ करायला मी काय फिरतोय का तिच्या मागं मागं.
 माझ्या काही अपेक्षा आहेत त्या तरी नकोत का सांगायला ?
लता: तू कोण अपेक्षा ठेवणारा ?
बापू: भंपकपणा करू नकोस ; मी कोण म्हणे ?
लता: भंपकपणा काय आहे यात ?
बापू: तिचं भलं बुरं आपण पाहायला हवं
लता: उगाच काहीतरी बडबडू नकोस !
बापू: बडबडणं नाही, मी खरंच सांगतोय !
लता: तुला कोणी विचारलंय का ?
बापू: माझ्या बोलण्याला काही किंमतच नाही, असा याचा अर्थ आहे.
लता: स्वतःची किंमत ठेवून घ्यावी लागते माणसानं ! एका नॅशनालाइज्ड
 बँकेचा मॅनेजर होतास तू.

रुपक । २४ ।