पान:रुपक.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता  : प्रत्येकाला आपापल्या पध्दतीनं जगण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं.
बापू  : मी कुठं नाही म्हणतोय, स्वातंत्र्य हवंच, पण मर्यादाही हव्यातच ना ?
लता  : तू हेकेखोरपणा सुरू केलास म्हणून ती ही संतापली.
बापू  : अगं, मी काही फार वेळ घेणार होतो का तिचा ? तू ही जगावेगळं
 असल्यासारखं सांगतीयस मला.
लता  : नाही आवडत तिला पूजा - बिजा, तर आपण आग्रह का करायचा
 म्हणते मी ?
बापू  : पूजा करणं म्हणजे केवळ कर्मकांड नाहीये लता. हां, आता असतो
 पूजेचा थोडा विधी, पण त्यात भाव असतो, श्रध्दा असते. तुम्ही भावनाहीन,
 श्रध्दाहीन जगाल तर जगण्यातच काही अर्थ नाही.
लता  : हे बघ, कुणी कसं जगावं याचं दडपण आपण आणू शकत नाही.
 रूपानं तू म्हणशील तसं वागावं हा तुझा 'वेडगळ' हट्ट आहे.
बापू  : वेडगळपणा काय आहे त्यात. तुझा हा लॅपटॉप ओपन करायची एक
 पध्दत आहे की नाही ? आधी हे बटन पुश करा, मग है, मग तो
 कर्सर ! हा विधीच आहे. तो करता ना तुम्ही ?
लता  : कोणतीही गोष्ट कशाशीही जोडू नकोस. भक्ती, श्रध्दा वेगळी आणि
 लॅपटॉप वेगळा !
बापू  : लॅपटॉपवर म्हणजे तुमच्या कामावर तुमची श्रध्दा आहे ना ?
 ते करण्यासाठी काही प्रोसेस आहे. तसं निरामय जगण्याची प्रोसेस
 म्हणजे पूजा आहे, कळलं ?
लता  : आपलं तत्वज्ञान आपल्यापाशी ठेवावं, दुसऱ्यावर लादू नये.
बापू  : जगण्याच्या अनुभवातून निर्माण झालेलं तत्वज्ञान आहे ते, इतरांना
 सांगायला काय हरकत आहे ? माणसं शहाणीच होतील ना त्यानं ?
लता  : विचारलं तर सांगावं तत्वज्ञान ! आणि अनुभवाचं म्हणशील तर तो
 स्वतः घेण्यातच अर्थ आहे. दुसऱ्याच्या अनुभवावर तिसरा शहाणा
 होईल हे तुझं म्हणणं मला पटत नाही.
बापू: 'अनुभवाचे बोल' नावाचा प्रकार असतो की नाही काही ?
लता  : आवश्यकता असेल तर बोलावं माणसानं.
बापू: 'बोलणं' हा उपजीविकेचा व्यवसाय झालाय हल्ली. अशा बोलण्यात
 अनुभवाचा भाग हवाच ! रूपाचं काम नाही तरी हेच आहे.

रुपक । २३ ।