पान:रुपक.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्पर्शाची भाषा !

मानवी जीवनातील स्पर्शाचे महत्त्व वेगळं सांगायला नको. स्त्रियांच्या वाट्याला जगणं फुलवणारे स्पर्श जसे असतात तसे जगणं उद्ध्वस्त करणारे स्पर्शही होतात. त्याबाबतच्या अनेक घटना आजही आपण रोज ऐकतो, वाचतो. याच स्पर्शाच्या अनुभूतीचं 'रूपक' किती दाहक रूप धारण करू शकतं याचं दर्शनरजनीश जोशी यांनी या नाटकातून घडवलंय. नको त्या स्पर्शाचा किळसवाणा अनुभव घेतलेली एक तरुणी अपत्य प्रेमासाठी आसुसलेल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीच्या मायाळू स्पर्शाचा विपरित अर्थ काढते. असं म्हणतात की स्त्रीला पुरुषी स्पर्शाची भाषा चटकन कळते. पण इथं मात्र त्या तरुणीला कटू अनुभवामुळे त्यातील माया कळत नाही. आणि मग सुरू होतं एक भीषण नाट्य. माणुसकीवरचा विश्वास उडून जावा असं जाळं विणलं जातं. त्याचा शेवट भयानक होतो. त्यातून अजून एक सत्य समोर येतं आणि ती तरुणी उध्वस्त होते. प्रेक्षक सुन्न होऊन जातो, हळहळतो.
 पकड घेणारी संवाद शैली, उत्कंठा वाढवणारे कथानक आणि तीनच पात्रांनी घडवलेले नाट्य ही या नाटकाची बलस्थानं आहेत. या नाटकातील लताची भूमिका साकारत असताना मला खूप समाधान लाभले.

शोभा बोल्ली, सोलापूर


स्पर्शाचे भावनाट्य !

'रूपक' हे नाटक एका वेगळ्या विषयाला हात घालते. या नाटकात स्त्रीचे स्पर्शज्ञान आणि त्याचा तिला होणारा त्रास हा विषय घेऊन त्याची सुरेख मांडणी करण्यात आली आहे. 'रूपक'मधील बापूची व्यक्तिरेखा साकारताना एक कलाकार म्हणून खूप छान अनुभव आला. या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीत सगळी पारितोषिके पटकावली. 'रूपक' या नाटकाच्या प्रयोगनिर्मितीत माझी आंतरिक जवळीक होती. या नाटकाने मला खूप समाधान दिले.

प्रदीप कुलकर्णी, पुणे