पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुक्कामाला सेमाडोहात जाई. शाळेत मुले भरपूर. मुली त्याहून जास्त. शाळेत मिळणारी खिचडी, मुलीला रोज मिळणारा रुपया यामुळे शाळेत भरपूर मुले होती.
 कोरकूंचे घर अक्षरश: देखणे, उंचावरून सूर मारावा तशी उतरती, गवताची छपरे. आतले घर शेणाने भिंतीसकट सुरेख सपोत सारवलेले. वर चुन्याने काढलेली चित्रे. आणि अगदी बुटके, अडीच तीन फूट उंचीचे दार. तीन बायकांना आम्ही नाव विचारले. त्यानुसत्याच हसत होत्या. आमच्या सोबत एक आदिवासी शिक्षक होता. त्याने विचारले 'विहीइमाकृविहील्या' मग उत्तर आले.
 "सुमुरती, मीरा, सांती जी"
 चाळिशी ओलांडलेली स्मृती आणि तिशीतल्या मीरा व शांती. जंगलात वेगवेगळ्या मधमाशांचा मध मिळतो. परतवाडा, धारणी, अमरावतीकडचे व्यापारी येतात आणि शेरभर मधासाठी शेरभर खडेमीठ देवून जातात. जंगलात मीठ अगदी दूर्मिळ... गावचा सरपंच सोमा सांगत होता.
 ... आम्ही वाघाच्या डरकाळ्या ऐकायला उत्सुकलो होतो. पण ना त्याने दर्शन दिले ना जीव थिजवणारी डरकाळी मारली. मात्र दोन दिवसांपूर्वी मोरपिसांची सळसळ आणि पिसारा फुलवू नाचणारे मोर मात्र मनाला... डोळ्यांना सुखावून गेले. माकडे मात्र दोस्त बनली होती. हे सगळे आठवत असतांना पाऊस मात्र धुवांधार कोसळत होता. रात्रभर पाऊस. सागाच्या रूंद, दडस पानांवर लयीत कोसळणारा पाऊस, त्याचा घनगंभीर नाद. भवताली सुम्म शांतता. तो घुमणारा आवाज ऐकतांना मला आठवला लहानपणी ऐकलेला मंत्रजागर. शेजारच्या घरी नवरात्रात मंत्रजागर असे. सोळा वेदशास्त्री ब्राह्मण दोन गटात समोरासमोर बसत आणि वेदातील मंत्र विशिष्ट लयीत, स्वरात अगदी एकात्मपणे गात. त्या रात्री तो पाऊस माझ्या मनात मंत्रजागराची सय जागवून गेला.
 ... दुसऱ्या दिवशी जाग आली ती सिपनेच्या वेगवान आवाजाने. सिपनेच्या पात्राजवळ रूंद डेऱ्याचे अर्जुन वृक्ष, साग आहेत. त्यांना कवेत घेऊन उफाणत, फणफणत, फेसाळत, उंचउंच उड्या घेत ती धावत होती. चहा घेण्यासाठी वनसंकुलाच्या उपहारगृहात आलो तर कळले की पुलावरुन पुरूषभर पाणी वाहतेय. पुलापाशी जाऊन सिपनेचे उरात धडकी भरविणारे रूप पाहिले. समोरच्या तीरावर अनेकजण थांबलेले. अलिकडच्या तीरावर दूध भाजीपाला घेऊन विकायला जाणारे आदिवासी थांबलेले. हो, एक आदिवासी सांगू लागला की पाच वर्षांपूर्वी असाच पूर आला होता. तो सहा दिवस ओसरला नव्हता. हे ऐकून मात्र मन बेचैन झाले. दुसऱ्या

रुणझुणत्या पाखरा / ८५