पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खरं तर अशा वेळी फक्त डोळेच सजीव असतात. काही लिहावं म्हटलं तर बोटं पेन हातात घेत नाहीत. तऱ्हेतऱ्हेच्या पानांचा मलमली तर कधी मखमली स्पर्श साठवण्यात मग्न होतात. खोडांचे स्पर्श कधी खरबरित तर कधी नितळ. चार दिवसानंतरच्या एका थंडगार दुपारच्या वेळी छोट्याशा चौकोनी व्हरांड्यात आले... आद्रक आणि गवती चहाची पानं घातलेल्या चहाच्या घोटांचा आस्वाद घेत काय लिहावं, असा विचार करतेच तोच भर थंडीत पाऊस सुरू झाला. पहाता पहाता पावसाचा जोर एवढा वाढला की वाटावे आभाळच दहा ठिकाणी फुटलेय. तिकडच्या लोकांना याची सवय असावी. मेस मधला एक नोकर दोन छत्र्या आम्हा देऊन गेला. येतांना न विसरता वाफाळलेला चहा आणला होता. या राहुट्यांवर उतरती छपरे आहेत. आता मात्र त्यांची टिप्-टिप् ऐकत गेल्या चार दिवसातले सुंदर क्षण आठवण्या पलिकडे हातात काहीच उरले नव्हते!!
 ...इथे आल्यावर पहिले दोन दिवस सिपनाच्या प्रवाहाचा घुमता नाद ऐकत, भवतालचे नीरव हिरवे निवांतपण मनात... तनात रूजवण्यातच गेले. लेखणीतले प्राण जागेनात. मग डोंगरातल्या कोरकू जमातीच्या आदिवासींच्यात फिरायचे ठरवले. मेळघाटातल्या घटांग डोंगरावर अगदी उंच टोकावर माखला नावाचे खेडे आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. म्हटलं माखल्याचा डोंगर जीपमधून चढतांना वाघोबा दर्शन देतील. पण छे!! या परिसरात पावसाळा दरवर्षीच मुक्तपणे बरसत असतो. साग, आवळा, मोह या झाडांची गर्दी असलेले भवतालचे डोंगर. पानांचे दाट झुलते पिसारे ऐल पैल पसरून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे आहेत. दूरचे डोंगर भर दुपारी थेंब धुक्याची तलम ओढणी माथ्यावर ओढून नजरेवर चेटुक घालताहेत. पंचवीस तीस अंशाचा कोनात वळणार डोंगरातला रस्ता. तोही अरूंद. एका बाजूला डोळे फिरवणारी दरी तर दुसऱ्या बाजूला हिरवी भिंत. पायाशी निळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, गुलाबी रानफुलांची गालातल्या गालात खुदुखुदु हसणारी गर्दी. मध्येच रानकपाशीची प्रौढ पिवळी फुलं. आमच्यातला एक जण जीप थांबवून फोटो काढी. फिल्मचे रीळ संपले तरी तृप्ती नाही. शेवटी एक जण म्हणालाच. बेट्या आपण लेखक. नजरेचा कॅमेरा कधी थकतो का? आणि संपतो का? डोळ्यातला कॉम्प्युटरवर साठवून ठेव फोटो. आठवण आली की डोळे करायचे बंद आणि चालू करायची मनातली चिरंजीव चित्रफित !!
 तर माखल्यात पोचलो. ज्वारी, मक्याची छोटी छोटी शेते दिसू लागली. हे गांव मुलांच्या कुपोषणामुळे विधानसभेत गाजलेले आहे. या वस्तीत दोन घरे गवलांची... गवळ्यांची, एक घर गोंडाचे तर बाकीची घरे कोरकूची गावात सातवी पर्यन्त शाळा आहे. सहा शिक्षक रोज येत. इथे सकाळी नऊ वाजता एक बस येई. ती सायंकाळी

८४ / रुणझुणत्या पाखरा