पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवशी सुरेख ऊन पडले. वाटले आता ओसरेल पूर. बासुंदी सारखा चहा पितांना छान वाटले. पण दुपारी उपहारगृहाच्या मालकाने विनंती केली. दोनच फलके मिळतील. खडी बासुंदी भरपूर प्या. पूर यायच्या आदल्या दिवशी त्याने गव्हाच्या दळणाचे पोते सिपने पलिकडच्या सेमाडोह गावच्या गिरणीत पाठवले होते ते पलिकडे अडकले होते. प्रत्येक कोरकू... गोडाच्या घरात जाते असते. चार पैसे जास्त देऊन गहू जात्यावर दळून जाणावे तर त्याच्या जवळचे ते शेवटचे पोते होते संध्याकाळी खिचडी नि ताकाचा वरवा सुरू झाला.
 सिपना डोंगरातून उड्या घेत येते. या परिसरातला पाऊस शांतवला तरी पल्याडच्या भागात धो धो पाऊस असणार. पेपर्स नाहीत. फोन बंद. मोबाईलची रेंज नाही. रात्री कंदिलांचा प्रकाश. मी ठरवून टाकलं. मिळेल ते खायचं. पानाफुलांत हिंडायचं. भवतालची नीरव हिरवाई शब्दांतून वेचायची. आमच्यात एक बॉटनीवाले मग सगळे त्यांना सतावणार! कवितांना ऊत. प्रत्येकाच्या लेखणीतले प्राण जागे झाले. आणि भरदुपारी अनुभवलेली घनगर्द रात प्रत्येकाच्या मनात, शब्दांत, डोळ्यात नोंदली नाही तर गोंदली गेली. पाचव्या दिवशी सिपनादेवी शांत झाल्या. पुलावरचे पाणी ओसरले... पण त्या वेळी मनात भरदुपारी गोंदले गेलेले घनगर्द रान आजही हिरवेगार आहे.

८६ / रुणझुणत्या पाखरा