पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 भर दुपारीची वेळ. भवताली सागाच्या झाडांची दाट गर्दी. माथ्यावर पानपिसाऱ्याचे घनगर्द छप्पर. भवताली मंदमधुर तरंगती हवा हेलकावे घेत अंगाअंगाला गुदगुल्या करीत फिरणारी. जणू आपण पानेरी हिरव्या सागराच्या तळाशी हिरव्या गर्दीत, झुळझुळत्या लाटांचे रेशमी झेलित उभे आहोत. चार दिवसांपूर्वी इथे आलो तेव्हा आमच्या स्वागतासाठी उभा होता सागवृक्षांचा दाटीवाटीने उभा राहिलेला परिवार. डोंगराला पाठ देऊन प्रौढ, ज्येष्ठ झाडे रूंदबंद पानांवर खानदानी नर्म हासू घेऊन उभी होते. त्यांच्या पुढ्यात प्रौढ... तरूण झाडे, अदबीने उभी. साऱ्यांचेच माथे चांदण फुलांनी मोहरलेले. पायाशी उभी असलेली चिमण्या झाडांची पिलावळ.
 आम्ही दहा दिवस सेमाडोह मधल्या सिपना नदीकाठच्या सरकारी तंबुमध्ये रहाणार होतो. तंबू म्हणण्यापेक्षा सिमेंट, विटांचा वापर करून उभ्या केलेल्या शासकीय गोलाकार राहुट्याच. या हऱ्याबऱ्या संकुलात येतांना सिपना नदी पार करावी लागते. सिपना म्हणजे साग. साग बनातून सिपना चन्द्राकार वळण घेऊन पुढे जाते. त्या चन्द्राकारावर या राहुट्या उभ्या आहेत.
 महाराष्ट्रातील लेखकांकडून कांही नवे ललित म्हणजे कथा कादंबरी कविता इत्यादी लेखन करून घ्यावे या हेतूने शासनाने या परिसरात कार्यशाळा घेतली होती. म्हणून ही निसर्गाची जवळीक डोळाभरून अनुभवता आली.

रुणझुणत्या पाखरा / ८३