पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डोळे ओले होतांना
खोप्यासाठी तरण्यापोरी काकुळतीला येतांना...
पाऊस आला अवकाळी
भिर भिर डोळे आभाळी...

 स्त्रीच्या मनातला सृजनाचा आनंद सांगतांना त्यांच्या हृदयातून शब्द अंकुरतात
निस्सीम आनंदाने
मृगाचं पेरतांना
काळ्या माऊलीची शपथ घेतांना
तिला भरून आलं रानभर...
माणसाच्या जगण्याचं
सगळं काही साठलंय
ह्या माऊलीच्या पोटात...
तिनं पेर सुरू केली.
आणि हे सारं किती सहज...हसत
कुठे शिकलीस ग माये, दुःख सोसण्याचा वेणा?
साऱ्यांसाठी हसण्याचा पुन्हा खोटाच बहाणा...

 गेल्या दोन दशकात स्त्रीची कविताही आत्मभान घेऊन येते आहे. १९६० नंतर स्त्री आपल्या व्यथा निर्भयपणे व्यक्त करू लागली.
 इंदिरा संत 'कुणी न पुरते आधाराला' या कवितेत लिहितात,

खोटी माती नभही खोटे
कुणी न पुरते आधाराला
दुभंगते ना माती अजुनी,
गगन उघडिना तिसरा डोळा

 आसावरी काकडेंच्या कवितेतली भूमी दान मागणारी नाही. दान देणारी आहे.

पाऊस धारांचे हात पसरून
गंध मागतसे आकाश वरून
असे मागणे ऐकून माती सुखावते आणि
मातीच्या तृप्तीचे बोभाट जाहले
तृप्तीच्या गंधाने आकाश भरले...

 आजच्या महिला कवींच्या कवितेतून भेटणारी भूमी स्वरूपा स्त्री स्वत:च्या माणुसपणाचे, सर्जनाच्या उर्जेचे, अस्मितेचे भान असणारी आहे. ललिता गादगे म्हणतात,

रुणझुणत्या पाखरा / ८१