पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  लोकपरंपरेतील सीता नम्र आहे. तेजस्विनी आहे. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जपण्यासाठी भुईत नाहीशी होणारी सीता ही अग्निपरिक्षा देणाऱ्या पतिव्रता सीतेपेक्षा वेगळी आहे. स्वाभिमानी भूमिकन्या सीता लोकगीतांतून समोर येते. राम मात्र पुरूषप्रधान जीवन व्यवस्थेचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. तो सीतेला विचारतो,

अंकुश पोटीचा, लहू कोनाचा सांग ।
धरनी झाली दोन भाग, तिच्या सत्वासाठी ।।
लहू न माझा, कूस कोनाचा सांग।
सीतामाई साठी, धरनी झाली दोन भाग ।।

 सीता शरणांगता होऊन रामाकडे परत जात नाही. तर, स्वाभिमानाने मातृगृही भूमीत विलीन होते.

 गर्भवती शकुन्तलेस राजा दुष्यन्त, होणारे मूल माझे नाही असे म्हणत तिला स्विकारत नाही. दुष्यन्ताने नाकारल्यावर माता उर्वशी... देवांचे मन रिझवणारी नृत्यांगना उर्वशी, शकुन्तलेस स्वगृही घेऊन जाते. सर्जन उर्जेत संवेदनशीलता असतेच. भूमी आणि स्त्री हे आदिमिथक त्यांच्यातील सर्जन उर्जेवर आधारलेले आहे. अनेक कवींच्या कवितांतील प्रतिमांतून ते व्यक्त होत असते. धरती आणि पाऊस, त्यातून बहरणारी हिरवी किमया रेखाटतांना बहिणाबाई लिहितात.

आला पहयला पाऊस
शिपडली भुई सारी
रुणझुणत्या पाखरा / ७९