पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  भारतीय लोकसंस्कृतीत इतके वैविध्य आणि वैचित्र्य आहे, इतक्या जटिल गुंतागुंती आहेत की त्यांचे चिकित्सक विश्लेषण करून त्याचा मूळ गाभा शोधणे कठीण जावे. जे विधी, ज्या गाण्यांतील शब्द अर्थहीन वाटतात त्यांत एकेकाळी जीवनाचे चैतन्य एकवटलेले होते. परंतु कालौघात विधींमागील संदर्भ सुटून गेले. शब्दांचे उच्चार... शब्द बदलत गेले. त्यात नवे संदर्भ घुसले. शब्दही घुसले. त्यामुळे त्यांचे स्वरूप व्याप्ती गुंतागुंतीचे होत गेले.

 द्रविड, दस्यू, आर्य, असुरांपासून ते मुघल, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश दर्यावर्दी आणि धाडसी परदेशी लोकांनी, या नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध भूमीवर संपत्तीच्या आशेने हल्ले केले. तीन बाजूंनी-पूर्वेकडे बंगालचा उपसागर, दक्षिणेकडे हिंदीमहासागर आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र अशा सागर सीमा आणि उत्तरेकडे पसरलेल्या उत्तुंग हिमालयाची सीमा. अशा नैसर्गिकरित्या एकात्म भूमीवर धनलोभाने स्वारी करणे जेवढे सोपे होते त्याहून येथून परत जाणे अवघड होते. त्यामुळे ज्या परदेशींसोबत विविध रिती... परंपरा या भूमीत आल्या त्या परदेशीसह इथे स्थिरावल्या. येथील मूलवासींसोबत त्यांचा संघर्ष झाला. नंतर मूलवासींनी त्यांना आपल्यात सामावून घेतले. समन्वयाच्या प्रक्रियेतून समरसता निर्माण होत गेली. केळीचे छोटे रोप वाढते. त्याच्या वरच्या आवरणावर अनेक आवरणे चढत जातात. ती एकजीव होऊन जातात. मूळ गाभा शोधायचा तर ही आवरणे सोलून वेगवेगळी करणे कठीण! तसेच भारतीय-

७६ / रुणझुणत्या पाखरा