पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगणे एवढाच तिच्या जीवनाला अर्थ उरला. तिने आपले दुःख दगडी जात्याजवळ मोकळे केले. तेवढाच तिला आधार होता.

ती स्त्रीचा जन्म दिल्याबद्दल परमेश्वराला म्हणते-
बैल राबतो भाड्यानं, परक्याचे दारी...

 पण माहेर म्हटले की तिचा जीव गलबलून जातो. भाऊबीज आली की तिचे डोळे भावाच्या वाटेकडे लागतात.
 भाऊबीज महाराष्ट्रात अत्यन्त भावुकतेने साजरी होते. राजस्थान, उत्तर, मध्य प्रदेशात राखी पौर्णिमेचे वा भाई पांचचे महत्त्व ते महाराष्ट्रात भाऊबीजेचे. धावतपळत भाऊ भाऊबीजेला बहिणीचे घर गाठतोच. न आला तरी ती रागवत नाही. चंद्राला ओवाळते व भावाला आयुष्य चिंतिते. बहिण भावाचे नाते नितान्त निरामय आणि आंतरिक नात्याने ओलावलेले असते.

पुनवेच्या दिशी चंद्र मोहरला
चंद्र आग का ओकेल काही केल्या..

 भाऊ बहिणीच्या नात्यांचा ओलावा सांगणाऱ्या हजारो ओव्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी रचल्या आहेत.
 स्त्री घर सोडून पतीच्या घरी कायमची आली. पण त्या घरी तिला तिचे अवकाश मिळाले नाही. त्यामुळे तिच्या ओव्यात माती आणि माहेर सतत डोकावते. सासरी डोक्यावरचा पदर कपाळ झाकेपर्यंत घ्यायला हवा. ती तिची मर्यादा पण माहेर म्हणजे मोकळपणा. भाऊबीजेसाठी येणारा भाऊ पाहून ती म्हणते
 खांद्यावरचा पदर डोकीवर मी झोकीला
 शेताच्या बांधाला बंधुराजा मी देखिला....

रुणझुणत्या पाखरा / ७५