पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामाजिक कार्याची विशेषतः 'मानवलोक' या सेवाभावी संस्थेच्या द्वारा त्यांनी केलेल्या समाजसेवेची कीर्ती जगभर पसरली आहे. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार पचवलेल्या त्या कर्त्या सुधारक आहेत. याला जोडून त्या प्रकृतीने ललित लेखिका आहेत. लोकसाहित्याच्या गाढ्या व्यासंगाने त्यांच्या सगळ्याच लेखनाला एक लोकतत्त्वीय परिमाण प्राप्त झालेले आहे. मुख्यम्हणजे त्या भारीच्या कवयित्री आहेत. 'सिटीझन आर्टिस्ट' ही महान आणि समाजसन्मुख प्रतिभावंतासाठी वापरली जाणारी संज्ञा ही खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठीच योजिता येईल. प्रखर वैचारिकता हे त्यांच्या लेखनात सर्वत्र जाणवणारे सूत्र आहे. त्यामुळे विचार आणि कवितेच्या संयोगातून आलेले 'रुणझुणत्या पाखरा' या संग्रहातील ललित गद्य, ललित गद्याच्या सर्व महान आणि सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेऊनच आपल्या समोर ठाकले आहे.
 'संक्रांत... प्रकाशपर्व' या लेखात बालपणीची संक्रांत उमटते. समाजवादी घर, देवघर, देवपूजा वा कर्मकांड नाही. पण सणानिमित्त गोडधोड खायला मिळे संक्रांतीचे साखरतीळ ऊर्फ हलवा करण्याच्या घरोघरच्या पद्धती, फसलेल्या काटे न आलेल्या साखरतीळांची चेष्टा, कुचेष्टा. तेराव्या वर्षापर्यंत नवरात्र आपटे आजी कुमारिका म्हणून सन्मान करायच्या. मग याच वर्षी का नाही बोलवलं हा बालसुलभ प्रश्न प्रौढांना अर्थ सुचवून जातो. समाजजीवनाचा धांडोळा असा प्रत्येक लेखात स्वाभाविकपणे घेतला जातो. 'अक्षरांना अर्थ देऊन' मध्ये तेजस्वी 'महा-तारे' प्रेरणा देऊन जातात. 'हे स्वरांनो गंध व्हा रे' मध्ये बालकामगारांचे प्रश्रोपनिषद कासावीस बनवते, अस्वस्थ करून टाकते.
 कविवर्य भा. रा. तांब्यांनी तरुणपणी उत्कट प्रेम कविता तर लिहिलीच; पण वृद्धपणीदेखील प्रेमाविषयी त्यांना वाटणारे कौतुक, अप्रुप संपले नाही. डॉ. शैला लोहियांनी क्रांतिकारी असा प्रेमविवाह केला (याही अर्थाने त्या कर्त्यासुधारक) पण आज साठीनंतरही त्या प्रेमाचा, प्रेम विवाहाचा किती उत्साहाने पुरस्कार करतात आणि त्या मागची वैचारिक भूमिका सूचीत करतात ते 'प्रेम, धर्म, बांधीलकी', 'तू ऐल राधा,' 'थंडी, थंडी... थंडी,' किंवा 'आषाढाचा पहिला दिवस' या लेखांतून वाचण्यासारखे आहे. एकदा राधेला कुतूहलाने म्हणा, मत्सराने म्हणा रुक्मिणी सत्यभामांनी घरी बोलावलं. तिथे पाय धुवून, त्यावर चंदन कुंकुम रेखून, वस्त्र देऊन पाठवले. मात्र पाणी उकळते वापरले. राधेला काही फरक पडला नाही. परंतु त्या रात्री कृष्ण घरी परतला तो लंगडत लंगडतच त्याच्या पायावर पोळल्यामुळे मोठे फोड आले होते. ही सुंदर कथा मी

आठ / रुणझुणत्या पाखरा