पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या ललितगद्यातच प्रथम वाचली आणि विलक्षण प्रभावित झालो. असे प्रभावित करणारे, झपाटून टाकणारे अधूनमधून सारखे या लेखांतून भेटेल.
 ट्रंकेच्या बुडाशी एखादी अत्तराची कुपी जपून ठेवावी तशा डॉ. शैला लोहियांनी माहेरच्या आठवणींना जोपासले आहे. राष्ट्रीय भावनेने ओथंबलेले माहेर सूत कातणारे, खादी वापरणारे आईवडील. साने गुरुजी, एस. एम. जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाश यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या लेखिकेचा खरंच हेवा वाटावा. त्यांची समृद्ध वैचारिक जडणघडण झाली ती या सर्वांच्या चर्चा ऐकून. ही वैचारिकताच त्यांच्या संवेदनस्वभावाचा अविभाज्य घटक झाली आहे. इतकेच नाही तर गेल्या तीस पस्तीस वर्षांच्या सगळ्या महान चळवळीत आणि आंदोलनात लेखिकेने प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. त्यांचे पडघम या लेखांतून अनुभवता येतात. बंगलोर येथे २८ जानेवारी १९९५ रोजी झालेल्या 'जनसुनवाई' बहुएका 'जखमी झाडांच्या साक्षी ऐकताना' हा ललितलेख शीर्षकापासून अंतरंगापर्यंत वेधक आहे. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या, विलक्षण अस्वस्थ करून टाकणाऱ्या अनुभवकथनांचा समारोप करताना त्या लिहितात, जनसुनवाईचा कार्यक्रम संपला होता. आता प्रत्येकीच्या देहात 'मनसुनबाई' सुरू होती. भूमिकन्या भवरीबाई, हा लेख तर विलक्षण जीवन, थरारक अनुभव अनोखे व्यक्तित्व लाभलेले भंवरीबाई हा लेख वाचणारे जन्मभर विसरू शकणार नाहीत. सेवा दलाचे 'महाराष्ट्र दर्शन' असेच प्रेरणादायी, चैतन्यमय अनुभूती देणारे. 'इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना' या श्रेणीमधले लेखिकेने अनुभवलेले असे अनेक मंतरलेले दिवस विलक्षण प्रत्ययकारित्वासह या संग्रहात अवतीर्ण झाले आहेत.
 या संग्रहात काही भावोरकट व्यक्तिचित्रंही आहेत. बाबा आमटे (त्र्याण्णव वर्षाच्या तरुणाकडून ऊर्जा चेतवून घेताना), वसंत बापट (हारवलेला वसंत), भास्कर चंदनशिव (फुलता मळा सतत बहरत राहो), साने गुरुजी (जून महिना आला की...), अनंत भालेराव (माहेरचा खोपा), महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्वांना माहीत असणारी ही नाव असली तरी त्यांचे वस्तुनिष्ठ चित्रण करण्याचा इथे प्रश्नच येत नाही. या व्यक्तिरेखा लेखिकेच्या अनुभवांगाचा भाग म्हणूनच साकारताना दिसतात. निवेदक 'मी' चा त्यांना झालेला अनुभव स्पर्श या व्यक्तिरेखांना वेगळी परिमाणे प्राप्त करून तर देतोच. पण त्याही पेक्षा महत्त्वाचे असते ते त्यांतून सूचित होणारा लेखिकेचा जीवन विषयक दृष्टिकोन अनुभवणे विचारांचे एक सुंदर अस्तर याही, पटाला असतेच.

रुणझुणत्या पाखरा/ नऊ