पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
शालू भिजला दवरांन माय माझ्या लक्ष्मीचा...
माज्या बाळाला बोलते अवंदा माल झाला किती?
वाडा चढे डौलानं, माझ्या राजसाचा...

 अमावास्येला लक्ष्मीपूजन असते. घर पणत्यांनी सजवतात. रांगोळ्यांनी अंगण सजते. या दिवशी सायंकाळी दिव्यांची पूजा असते. ताट भरून मातीच्या पणत्या चेतवतात देवासमोर वा बैठकीत लक्ष्मीची प्रतिमा ठेवून तिच्यासमोर खाली तांदूळ गहू ठेवून त्यावर पणत्यांचे ताट ठेवतात. पणत्यांची पूजा फक्त स्त्रियाच करतात. तसेच दौत, वही यांची पूजा करतात. वहीवर 'श्री' लिहून नव्या वर्षाचे हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात. वैश्य... व्यापारी समाजाचे वर्ष कार्तिक प्रतिपदेपासून सुरू होते. प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या, बत्तासे, खडीसाखर वाटतात. पूजेत धने, मूग, गूळ यांचा समावेश असतो.
 बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. तो सत्तेने माजला त्याने देवांना जिंकून लक्ष्मीला दासी केले. तेव्हा विष्णूने वामनाचा अवतार घेऊन त्याचा नाश केला. बळीकडे तो यज्ञात याचक म्हणून गेला व तीन पावले जमीन मागितली. एक पाऊल स्वर्गात दुसरे मृत्यूलोकात तर तिसरे बळीच्या डोक्यावर ठेवले. त्याला पाताळात पाठवले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समाज तुझे स्मरण करील असा वर दिला. परंतु बळीचे राज्ये येवो अशी शुभेच्छा शेतकरी समाज विविध विधींतून सतत करत असतो. कारण बळी हा शेतकरी होता. आपल्याकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हणत. केरळात श्रावणात ओणम् हा सण दिवाळी इतक्या थाटात साजरा होतो. अंगणात बळीचे प्रतीक म्हणून मातीचा ओटा तयार करतात. त्याभोवती रांगोळी घालतात. फुलांनी सजवतात. रात्री फेर धरून कैकद्विकळी हे नृत्य करतात. घरापर्यंत मातीची फुलांची पावले काढतात. या दिवशी पाताळात ढकलला गेलेला बळिराजा भेटायला येतो अशी समजूत आहे. पूर्वी बाली बेट भारताला लागून होते. त्याला पाताळ म्हणत. बाहेरून आलेल्या टोळ्यांनी बळिराजाला रेटत रेटत बाली बेटांत नेले. थर्स्टन नावाच्या शास्त्रज्ञाने तर ऑस्ट्रेलियातील लोकांचे व वनस्पतीचे दक्षिण भारतातील लोकांशी साम्य असल्याचे दाखवून दिले आहे.
 बळिराजा शेणाचा करतात. शेणाला शुभा म्हणतात. शेण हे सर्वात उत्तम खत, या सर्व बाबींचा अनुबंध महत्वाचा आहे.
 जी स्त्री भूमीस्वरूपा सर्जनतेचे प्रतीक मानली गेली. सन्माननीय मानली गेली. ती काळाच्या प्रवासात दुय्यम दासीसमान झाली, तिचे जगणे अत्यन्त दुःखमय झाले. रात्रंदिवस कष्ट करणे आणि खाली मान घालून समाजात व कुटुंबात दुय्यम दर्जाचे जिणे

७४ / रुणझुणत्या पाखरा