पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेणाचा सडा घालून त्यावर शेणाचे गोकुळ उभारतात. गवळणी तयार करून त्यांना सजवून मांडतात. या गोकुळाला वेस असते. शेतात जाणारी, पाणी भरणारी, स्वयंपाक करणारी, बाजार मांडून बसणारी अशा गवळणी त्यात असतात. त्यांत पेंद्या असतो आणि शेणाचा बळिराजा असतो. खेड्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेणाचे गोकुळ मांडून त्यात पेंद्या व बळिराजा मांडणे शुभ मानले जाते. मराठवाड्यात हे गोकुळ विधिपूर्वक मांडले जाते. पूजा करून घरदार घोषणा देते. अवकाशात आवाज उमटतात.

गाई म्हशीने भरले वाडे
दहिया दुधानं भरले डेरे

 बळीचं राज्ये येवो,-बळी म्हणजे शेतकरी,
 स्त्रियांच्या सणांत शेणाचे महत्त्व आढळून येते. शेण हे सुफलनासाठी अत्यन्त प्रभावी खत होते. याची जाण स्त्रीला अनुभवातून आली होती. खेड्यातल्या शेणाच्या गोकुळाची जागा शहरात किल्ल्याने घेतली आहे.
 धनत्रयोदशीला स्त्रियांची न्हाणी असतात. शेताशी, सर्जनाशी जोडलेल्या सर्व सणांत स्त्रियांचा सहभाग विशेषत्वाने असतो. त्या निमित्ताने घरातील सगेसोयरे एकत्र येतात. स्त्रिया आपले मन दगडी जात्याजवळ ओवीरूपाने मोकळे करतात. दिवाळीचे पदार्थ बनवायचे म्हणजे जात्याशी पहाटेपासून बसावे लागते. लेकीची वाट पाहणारी आई म्हणते-

जवारीपरीस तुरीचं पीक भारी
लेकापरीस लेक प्यारी...

 पहाटेच्या वेळी पहिला दिवा लावून लेकीसुनांना तेल उटण्याने न्हाऊ घालताना घरातील वडीलधारी स्त्री म्हणते-

दिवाळीचा दिवा, दिवा ठिवा दिवठणी
हिरवी नेसली पैठणी माय माझ्या लक्ष्मीनं..

 ही माय म्हणजे धरित्री. तिच्यातून निर्माण होणाऱ्या धनाचा सन्मान स्त्रीला नहाण्याचा पहिला मान देण्यातून व्यक्त होत असेल का? नक्कीच होत असेल!
 धनत्रयोदशीचा दिवा नरकचतुर्दशीला घरातून फिरतो या दिवशी पुरूषांच्या आंघोळी असतात. त्यांना तेल चोळून, उटणं लावून, सुगंधी आंघोळ घालून ओवाळतात. या दिवशी घरातील घाण, दुर्गंधी दूर होवो अशी प्रार्थना करतात.
 लक्ष्मी पूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा या दिवशी खरी दिवाळी. लक्ष्मीचे... सुबत्तेचे पूजन. पण ही सुबत्ता येते कुठून?

रुणझुणत्या पाखरा / ७३