पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शेतात आठदहा बोरी, प्रत्येकाच्या बोरांची चव वेगळी. शेंगड्या बोरीची बोरं वाळली तरी चवदार लागत. गर कितीही चोखला तरी बोरीची गोडी संपतच नसे. एका बोरीची बोरं टप्पोरी आणि देखणी पण चवीला मात्र कडवट आणि आंबटढुस्स ! ... दादाजी दादीजींची वाट पहाणारे डोळे ...मन. एक दिवस माझ्या शब्दातून फुलून डोलू लागले.

गावाकडच्या आजोबांची
पहातेय मी वाट
हिरव्या कंच हर्बऱ्याच्या
पेंढ्या आणतील साठ... गावाकडच्या दादाजींची पहातेय मी वाट
मऊ मऊ सुरकुत्यांची
गावाकडची आजी
घेऊन येईल कर्डईची
मेथीची भाजी
गावकडच्या दादीजी
कधी येतील आई
घेऊन मऊचा हुर्डा
अन् सायीचं दही...?

 ...आणि आता आमच्या नातवंडांचं आजोळ? रिती, कृती बदलल्या तरी रेशमी मधाळ स्पर्श तोच. आता अत्यन्त स्वच्छ पाण्याच्या टँकमध्ये, डोक्याला प्लास्टिकची रंगित टोपी घालून पोहोण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, कंम्प्युटरचे तऱ्हेतऱ्हेचे क्लासेस, वेगाने गणिताची सोडवणूक करणारी ॲबॅकस पद्धती, आपल्या नातवंडांना हसत खेळत... धाका शिवाय हे सारं शिकता यावे म्हणून आजोबा आजी नातवंडांना आजोळी आणतातच.
 'आजोळ' ही लहान लेकरांच्या मनातली चिमुकली, गोंडस स्वप्नभूमी आहे. १९९३ च्या किल्लारीच्या भूकंपात हजारो मुले अनाथ झाली. त्या चिमुकल्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाचे नांव 'आजोळ' असे ठेवले होते.
 ...पिढ्या बदलल्या तरी सगळ्यांच्याच मनातले. आजोळ, रसाळ, मधाळ असते. सत्तरी उलटली तरी पहाटच्या स्वप्नातून ते येतच राहते आणि पिढ्यान् पिढ्या अव्याहत येतच राहणार!

रुणझुणत्या पाखरा / ७१