पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आचमन करून भोवती पाणी फिरवून देवाला नमस्कार करी. डोळे उघडून आमच्याकडे पहात 'या रे पोरांनो' म्हणे. प्रसादाची खडीसाखर नि लोण्याचा चिमुकला मोठ्या सुपारी एवढा गोळा हातावर पडला की देवाला नि आजीला नमस्कार करून आम्ही गुरगुट्या भाताची वाट पहात असू. मागच्या शेताडीतल्या केळीच्या चतकोर पानावर गुरगुट्या तुपाळ भात, वर मेतकुट, डाव्या बाजूला मिठाची चिमूट नि त्या खाली लिंबाच्या खमंग गोड लोणच्याची फोड...
 दुपारी हुंदडतांना रात्री डोक्यावर पाटी घेऊन येणारा 'कुलपिऽ मल्ला ऽऽ ई' वाला आठवे. माठातून काढलेल्या पांढऱ्या पत्र्याच्या त्रिकोणी कुप्या असत. बदामाच्या पानावर आपली कुलपी तो काढून ठेवी नि धारदार चाकूने त्याच्या गोल गोल चकत्या करी. तेव्हाच बहुदा तोंडातले पाणी आवरण्याचा संस्कार आम्ही करून घेतला असावा. तरीही त्या पाण्याचा फुरका मारून अरूदादा म्हणेच 'भैय्या फालुदा...'. मग त्या बारक्या मटक्यातल्या उकडलेल्या लांबच लांब शेवया तो कुल्पीवर घाली.
 ...आज अठ्ठावन्न...साठ वर्षे उलटून गेलीत. आज आमची नातवंडं जेंव्हा त्यांच्या लाडक्या मॅगी नुडल्सचे निसटते रेशमी दोरे तोंडात घालतांनाची धावपळ एन्जॉय करतात तेंव्हा ते पाहून दूर दूर गेलेले दिवस मनात मिणमिणू लागतात..
 एक मामा मंगळदास मार्केटमधून येतांना हापुसच्या पेट्या घेऊन येई. मग रात्री जेवण झाल्यावर एक मामी आंब्याच्या फोडी करायला विळी घेऊन बसे. कितीही फोडी खाल्ल्या तरी बाठींसाठी भांडण लागेच.
 सुपर सॉनेट विमानासारखे दिवस पळत असत. मग विमानतळ दाखवायला एक मामा घेऊन जाई. माझ्या पपांची धुळ्याहून एखादी फेरी मुंबईला होईच. जुहूला घेऊन जाण्याचे लाड ते करीत. आमची दीड क्रिकेट टीम जुहूला जायला निघे. जातांना पपा बजावत. पाणीपुरीचा हट्ट करायचा नाही. कोरडी भेळ खायची. आणि नारळपाणी प्यायचं. पोचे पर्यन्त हो...हो... जुहू गाठल्यावर मात्र ओली भेळ, पाणीपुरी, नव्याने आलेले रगडापॅटीस सारे वसूल होई. नारळपाणी पोटात गेले तरी मार्केट मधून येतांनाच्या रस्त्यावरचा उसाचा रस प्यायची हुक्की पपांनाच येई. मग काय आमचीही मज्जा..
 माझी मुलंही गावांकडच्या दादाजी, दादीजींची वाट पहात. ते दोघे मोठ्या घरी उतरले तरी हर्बऱ्याच्या पेंढ्या, ऊस, भाजलेला हुळा, खमंग दाणे, हुर्ड्याची कणसं, चवदार वाळकं, ओल्या गव्हाच्या ओंब्या. शिवाय भाजलेल्या ओंब्या. आणि गुळाची ढेप घेऊन येत. सुगीची धमाल लुटायला दादाजींकडे जाण्याची ओढ त्यांनाही लागे,

७० / रुणझुणत्या पाखरा