पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 उन्हाळ्याच्या सुट्टया जवळ येऊ लागत. आजीच्या सुरकुतल्या हातांनी हातावर ठेवलेला लोण्याचा गोळा नि खडीसाखर पहाटेच्या स्वप्नात येऊ लागे. आणि त्याचवेळी साखर झोपेत आई अंगावर पाणी टाकून उठवत असे.
 'उठा ताईबाई आज 'विंग्रजीचा प्येपर हाये.' तुमचा अवघड विषय. उद्या गण्या गण्या गणोबा. नि परवा. पहाटे मामाबरोबर पारल्याला निघायचंय.'
 ...उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे चहुअंगांनी भाजून टाकणारं बाभळीच्या काट्यासारखं ऊन, रोजन् रोज वाढणारं. खानदेश म्हणजे जणू कोळशाची भट्टी. त्या उन्हाची तलखी कमी व्हावी, तोंडाला चव यावी म्हणून निसर्गानेच कैऱ्या आंब्याचे दिवस या काळात नेमले असावेत. विलेपार्ले माझे आजोळ. आमच्या धुळ्याला चटकगोड रायवळ आंब्याच्या पाट्या खेड्यातून भरभरून बाजारात येत. आग्रारोडवरच्या कोपऱ्यावर बाया आंबे विकायला बसत. रुपया, आठ आणे डझनाचा आंबा घरात येई. रस रोजच लागे. पारल्याला गेल्यावर एक मामा पायरीच्या करंड्या घरात आणून टाकी. अकरा भावंडांची लेकरं त्या अवाढव्य सरस्वती बंगल्यात जमली की जणू त्या बंगल्याची लांबी रुंदी कमी होई. लपायला शेजारच्या बंगल्याच्या मागे शेताडीत उड्या मारून जावे लागे.
 सकाळी आठ वाजता गुरगुट्या भात, मेतकुटाची पंगत बसे. त्या आधी मोठ्या मामीने भल्यामोठ्या रवीने डेऱ्यात ताक घुसळुन लोण्याचा दगडी भला मोठा सट माई... आजीजवळ ठेवलेला असे. माई तो बाळकृष्णाच्या चिमुकल्या मूर्ती समोर ठेवी.

रुणझुणत्या पाखरा / ६९